आश्वासनानंतर आंदोलन मागे
दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन प्रशासनाने गिरणा नदी पात्रात चणकापूरचे पाणी सोडावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी तालुक्यातील लोहणेर येथे विंचूर – प्रकाशा राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तासभर चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली. शनिवारी पाणी सोडण्याचे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
चणकापूर धरणातून आवर्तनाचे पाणी गिरणा नदीत सोडून सुमारे ४५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला. परिणामी, देवळा, लोहणेर, विठेवाडी, भऊर, खामखेडा आदींसह गिरणा काठावरील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून गिरणा नदीला आवर्तनाचे पाणी सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र प्रशासन कोणतीही कार्यवाही करीत नाही. पाण्याअभावी शेतातील उभी पिके सोडून द्यावी लागत आहे. तर पिण्यासाठीदेखील पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. पाण्याअभावी गिरणा काठावरील पिण्याच्या पाण्याच्या योजना अडचणीत आल्या आहेत. दिवसेंदिवस पाणी प्रश्न भेडसावत असल्याने गिरणा नदी पात्रात त्वरित पिण्यासाठी पाणी सोडावे, या मागणीसाठी परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी िवचूर-प्रकाशा महामार्गावर रास्ता रोको केले. आंदोलकांनी देवळा तहसीलदार कैलास पवार यांच्याशी चर्चा केली. गिरणेला पाणी सोडण्याची लेखी हमी दिली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनास आंदोलनाबाबत माहिती दिली. त्यानंतर शनिवारी गिरणा नदीपात्रात पाणी सोडले जाणार असल्याचे आश्वासन मिळाल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात पंडित निकम, दिनकर जाधव यांच्यासह देवळा बाजार समितीचे संचालक योगेश आहेर, जगदीश पवार आदी सहभागी झाले होते.