नाशिक – सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील दोन लाख ६५ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. सुमारे ४० हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले. हे नुकसान आणि खरीप हंगामातील उत्पादनावर होणारा परिणाम, याचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन सदस्यीय पथकाने जिल्ह्यातील चांदवड आणि येवला या कांदा उत्पादक तालुक्यांत पाहणी करुन आढावा घेतला.

पथकात केंद्रीय फलोत्पादन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नवीन पाटे, उपायुक्त राहुल बिष्ट आणि अतिरिक्त आयुक्त हेमांग भार्गवा यांचा समावेशआहे. पथकाने कांदा उत्पादकांशी संवाद साधला. कृषी विभागाच्या कार्यालयात बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या पथकाने चांदवड आणि येवला तालुक्यास भेट दिली. अतिवृष्टीमुळे कांद्यासह अन्य खरीप पिकांच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामांची माहिती घेतली.

खरीप कांदा लागवडीखालील क्षेत्र आणि उशिराच्या खरीप कांदा लागवड क्षेत्राची माहिती घेतली. जिल्ह्यातील ५० हजार हेक्टरपैकी ४० हजार हेक्टरवरील खऱीप कांद्याचे नुकसान झाले आहे. यातील सर्वाधिक क्षेत्र चांदवड (१६४२२ हेक्टर) आणि येवला (१२६२५) तालुक्यात कांद्याचे आहे. नाशिकनंतर पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यालाही भेट दिल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. पंधरवड्यापूर्वी केंद्रीय कृषी विभागाच्या पथकाने लासलगाव बाजार समितीत भेट देऊन शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला होता. जिल्ह्याची अंदाजे २५ लाख टन इतकी साठवणूक क्षमता आहे. चाळीत १० लाख टन कांदा असण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टीचा पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्रास फटका

जिल्ह्यात २७ आणि २८ सप्टेंबर या दोन दिवशी झालेल्या अतिवृष्टीत दोन लाख ६५ हजार १८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पावसाचा फटका १५१९ गावांतील दोन लाख ८३ हजार ५०६ शेतकऱ्यांना बसला. जवळपास दीड लाख हेक्टर मका, सोयाबीन (२३६७५), भात (५५७०), कापूस (१६१८०), भाजीपाला (३०१२०), कांदा (३८७८३), कांदा रोपवाटीका (३४७) हेक्टर असे नुकसान झाले. डाळिंब आणि अन्य बहुवार्षिक फळपिकांचे एक हजार हेक्टरहून अधिक नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

जिल्ह्यातील नुकसानीची अंतिम आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाने १५१९ गावे बाधित झाली. सुरगाणा, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, मालेगाव, बागलाण, पेठ, निफाड आणि येवला या तालुक्यांतील १०० हून अधिक गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. तर उर्वरित तालुक्यात गावांची संख्या १०० हून कमी असल्याचे प्राथमिक अंदाजावरून दिसते.