नाशिक : इगतपुरी तालुक्यात १५-२० दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने भातशेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. महिनाभरात भातकापणीवर येण्याच्या बेतात आहे. या स्थितीत मध्येच पाऊस पडत असल्याने भातशेती संकटात येण्याच्या मार्गावर आहे.

इगतपुरी तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. तब्बल ३० हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. १००८ आणि इंद्रायणी हे दोन प्रकार मुख्यत्वे लागवड केली जाते. काही शेतकरी काळ्या भाताचे उत्पादन घेतात. कापणीचा हंगाम तोंडावर असताना पावसाच्या संकटाने रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. तालुक्यातील पूर्व भागात भातपिकावर करपा, पांढरा टाका, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी शेतकरी सध्या सेंद्रिय, रासायनिक खते, औषधे फवारणी करण्यात व्यस्त आहेत.

सततचा पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेले भातपीक शेतातील पाण्यात आडवे पडते आणि सडते. यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांचे आर्थिक समीकरण कोलमडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नष्ट झालेल्या भातपिकांमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. म्हणजे भातपिकाच्या नुकसानीसोबत चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुहेरी संकटात शेतकरी हवालदिल होत आहेत. उसनवारी करून लागवड केलेल्या भातपिकाला फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होत असल्याचे सभापती सोमनाथ जोशी यांनी सांगितले.

सध्या ऊन व नंतर पाऊस अशा उष्ण दमट वातावरणामुळे भातपिकावर मावा, तुडतुडा, अळी रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकऱ्यांनी वेळीच सावधगिरी बाळगून कीटकनाशके, औषधे फवारणी करून त्यावर नियंत्रण आणणे महत्त्वाचे आहे. भात हे मुख्यत्वे पाण्यातील पीक आहे. त्याचे मका, ज्वारी, बाजरीसारखे नुकसान होत नसल्याचे तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तवर यांनी सांगितले. सध्याच्या वातावरणाने रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर औषधे उपलब्ध केल्याचे त्यांनी नमूद केले.

हाळे भातपिके सोंगणीवर आले असल्यामुळे पाऊस त्यांच्यासाठी धोकेदायक ठरत आहे. परंतु गरे भाताच्या वाणासाठी पाऊस थोडय़ा फार प्रमाणात पोषक आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान या निकषात भातपीक बसत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्तांना भरपाई मिळत नाही.

उष्ण व दमट वातावरणामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात आढळून येतो. त्यातच पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भाताचे नुकसान होत आहे. गुरे, वासरांसाठीदेखील चाराटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

रामदास गव्हाणे