आजच्या झगमगत्या कापडी दुनियेत देखील पारंपरिक सोहळ्यात मिरवण्यासाठी मखमली ‘पैठणी’ आपला आब राखुन आहे. मात्र झगमगत्या दुनियेतील बदलता कल पाहता विणकरांनी या पैठणीला आधुनिकेता वेगळा असा आयाम दिला आहे. येवला येथील शाकंभरी हातमाग व हस्तकला विणकर सहकारी संस्था यांनी एकत्र येत टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेचा आधार घेत पैठणीचे खास कला दालन साकारले आहे. दालनात पैठणी बनविल्यानंतर उरलेल्या कपडय़ातून, धाग्यातून तसेच जरीचा वापर करत आकर्षक प्रावरणे, विविध कपडे यासह ‘अ‍ॅसेसरीज’ मांडण्यात आल्या आहेत. हा अनोखा प्रयोग सर्वाचे लक्ष वेधणारा ठरला आहे.
येवला येथील देवांग कोष्टी समाजाच्या विणकरांनी एकत्र येत समाजाच्या उन्नतीसाठी तसेच महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शाकंभरी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचा भाग म्हणून महिलांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी, त्यांचे कौशल्य समोर यावे यासाठी संस्था कार्यालयात कला दालन तयार करण्यात आले. त्यासाठी संस्थेच्या कार्यकारणीसह अन्य सदस्यांनी प्रयत्न केले. पैठणी तयार करतांना वापरण्यात येणारे सुत, विविध रंगसंगतीतील पैठणीचे धागे, जर यासह अन्य सामान पैठणी तयार झाल्यानंतर शिल्लक राहते. काही वेळा एखादे वस्त्र विणतांचा खराब निघते अशा परिस्थितीत ते वस्त्र किंवा उरलेले सामान फेकुन देण्याची वेळ विणकरांवर येते. यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच, पण वेळही वाया जातो. यावर ‘फॅशन डिझायनर’ ज्योती बाबर यांनी उपाय शोधण्याचे निश्चित केले. फॅशन तज्ज्ञ असल्याने काळानुरूप बदलणाऱ्या अभिरूची, युवकांची गरज तसेच महिलांची आवड त्या जाणून आहेत. या शिवाय बाजारपेठेचा अभ्यास असल्याने ग्राहकाला काय हवे ते त्यांना नेमके कळते. यासाठी त्यांनी कला दालनाची संकल्पना मांडली. मात्र त्या आधी त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेचा आधार घेत युवतींसाठी वेस्टर्न लूक असलेला पण पैठणीचा पंजाबी ड्रेस, लहान मुलींचे ओपन नेक, बॅकलेस गळ्याचा प्रकार असलेले फ्रॉक, बालकांसाठी कुंची, झबले तयार केले. तसेच, पैठणी नेसल्यानंतर किंवा पैठणी पॅटर्नमध्ये एखादा पोशाख घातल्यानंतर त्यावर मॅचिंग अशी याच खराब मालातून त्यांनी अ‍ॅसेसरीज तयार केली. त्यामध्ये गळ्यातल्या माळा, बांगडय़ा, कानातले, बिंदी, कमरपट्टा यासह अन्य काही आभुषणेही तयार केली. जेणेकरून एखाद्या युवतीने लग्नासाठी पैठणी पसंत केली तर तिचा संपुर्ण पेहराव हा त्याच पध्दतीने कसा राहील यासाठी काम केले. तिची पर्स, बटवा असे सामानही खास तयार करण्यात आले आहे. या शिवाय लग्न सराईतील रुखवताचाही त्यात अंतर्भाव आहे. या सर्व वस्तु रसिकांना पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात व्यवस्था करण्यात आली. ग्राहकांच्या मागणीनुसार त्या तयारही करून देण्यात येतात. संस्थेच्या अभिनव उपक्रमामुळे महिलांच्या कौशल्याला वाव मिळाला असून पैठणीपासून बनविण्यात येणाऱ्या विविध वस्तु ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paithani exhibition in nashik