गुरुवारी दुपारपासून शहराच्या विविध भागांत मोठय़ा प्रमाणावर वीजपुरवठा खंडित झाला. शुक्रवारीदेखील तीच परिस्थिती कायम होती. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत महावितरणच्या कारभाराविरुद्ध संताप व्यक्त केला. दोस्ती गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयात धाव घेऊन कर्मचाऱ्यांना जाब विचारला. महावितरणचे कोणतेही अधिकारी दूरध्वनींना उत्तर देत नव्हते, नागरिकांना माहिती देत नव्हते, महावितरणच्या एफसीआय रस्त्यावरील कार्यालयातील दूरध्वनी सातत्याने बंद ठेवला जातो. महावितरणच्या एकूणच गलथान कारभारामुळे मनमाडकर त्रस्त झाले आहेत. गणेशोत्सवात महावितरणने अखंडित वीजपुरवठा करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

गणेशोत्सवात तरी सुरळीत वीजपुरवठा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्याच दिवसांपासून महावितरणने झटका दाखवत ग्राहकांना त्रास देणे सुरू केले. पाऊस नसतानाही वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. शिवाजीनगर, हुडको, विवेकानंदनगर, आययूडीपी या मोठय़ा नागरी वस्ती असलेल्या भागांमधील गणेश मंडळांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले होते.

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी मनमाड शहर पोलीस स्थानकात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत वीज खंडित होत असल्याचा प्रश्न चांगलाच ऐणीवर आला होता. शहरात कोणतीही पूर्वसूचना न देता तासंतास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली होती. सर्व तक्रारींची आपण गंभीर दखल घेतली असून गणेशोत्सव काळात अखंडित वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासन महावितरणचे शहर अभियंता एस. बी. शिंदे यांनी दिले होते, परंतु त्यांनीही आश्वासन पाळले नाही. वाघदर्डी फीडरमध्ये बिघाड झाल्याने शुक्रवारी सकाळपासून मनमाड शहराच्या विविध भागांचा विविध पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.