जळगाव – जिल्ह्यात सप्टेंबरमधील नैसर्गिक आपत्तीचा फटका दीड लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांना बसला असताना, सर्वाधिक ९० हजार हेक्टरचे नुकसान कपाशीचे झाले आहे. शेतकरी दसरा-दिवाळीला कापूस घरात येण्याची आशा बाळगून होते. मात्र, बराच कापूस सततच्या पावसाने काळवंडला. जेमतेम हाताशी आलेल्या कापसाला वाळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
रोग व किडींचा विळखा, उत्पादनात घट, मजूर टंचाई आणि कमी भाव, या कारणांमुळे आधीच शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची लागवड कमी केली आहे. त्यात, महागडे बीटी बियाण्यासह रासायनिक खते, किटकनाशके आणि मशागतीवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केल्यावर शेतातील कपाशीचे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे उद्धवस्त झाले आहे.
दसरा झाल्यावर कापूस घरात येऊन दोन पैसे मिळतील आणि कुटुंबाची दिवाळी साजरी होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, पीक हाताशी येत नाही तितक्यात अतिवृष्टीसह नदी-नाल्यांच्या पुरामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकच नाही तर मातीही खरडली गेली. काही ठिकाणी कपाशीचे पीक वाचले असले, तरी परिपक्व कैऱ्या आणि वेचणीवर आलेल्या कापसाचा दर्जा पावसात भिजल्याने खालावला आहे.
गावोगावी सध्या शेतकरी भिजलेला कापूस वाळवण्याची धडपड करताना दिसत आहेत. पहिली वेचणी सुरू असतानाच झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी बोंडे सडली असून वेचलेला कापूस ओला झाला आहे. ओल्या कापसाचा दर्जा खालावल्याने त्याला योग्य दर मिळेल की नाही, याबाबत शेतकऱ्यांत साशंकता दिसून येत आहे.
व्यापाऱ्यांनी योग्य भाव न दिल्यास मोठा आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो. सध्या शेतकरी वेचून आणलेला कापूस घरासमोर किंवा अंगणात उन्हात वाळवत आहेत. अनेक गावांमध्ये प्रत्येकाच्या घरासमोर पांढऱ्या कापसाच्या ढिगाऱ्यांचे दृश्य त्यामुळे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मते, पावसामुळे भिजलेल्या कापसाचा ओलावा निघून जाईपर्यंत वाळवणे अपरिहार्य झाले आहे. मात्र, दर्जा खालावल्यानंतर बाजारात अपेक्षित भाव मिळेल की नाही, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून अवकाळी पावसाने त्यांचे अर्थकारण बिघडवून टाकले आहे.
कापूस पिवळा पडण्याची भीती
अवकाळी पावसामुळे कापसाच्या शेतामध्ये साचलेले पाणी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. पावसाची उघडिप मिळाल्यानंतरही अनेक शेतांमध्ये पाणी तसेच असल्याने कापूस वेचणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा मजुरी देऊन कापूस वेचावा लागत आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी अनेक शेतकरी शेतातील पाणी बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. परंतु पावसाच्या तडाख्याने कपाशीची झाडेही मोठ्या प्रमाणात खराब झाली आहेत. अशा स्थितीत पहिल्याच वेचणीत शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. मजुरी दर वाढवून शेतकरी कापूस वेचणी सुरू करत असले तरी घरात ओला कापूस साठवून ठेवल्यास तो पिवळसर पडण्याची भीती आहे.
हंगामाच्या सुरूवातीलाच कापसाचे दर घसरले आहेत. दर्जा खालावल्यास बाजारात त्यास आणखी कमी भाव मिळण्याची शक्यता असल्याने ओला कापूस अंगणात वाळवण्याची धडपड करीत आहे. – पद्माकर पाटील (शेतकरी- ममुराबाद, ता. जि. जळगाव)