धुळे : जिल्ह्यातील बारीपाडा (ता.साक्री) येथील जंगलात दुर्मिळ ’चापडा’ जातीचा साप आढळून आल्याने परिसरातील जैवविविधतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. सततच्या पर्यावरणीय उपक्रमांमुळे या भागातील जैवविविधता संवर्धनाला मोठी चालना मिळाली आहे. अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि वनप्रेमींनी केलेल्या प्रयत्नांमुळे या प्रदेशातील नैसर्गिक अधिवास जपला गेला असून, त्याचा परिणाम म्हणून या दुर्मिळ सर्पाचे दर्शन झाल्याचे सांगितले जाते. या शोधामुळे बारीपाडा जंगल केवळ जैवविविधतेचा खजिना नसून अनेक दुर्मिळ प्रजातींचे सुरक्षित निवासस्थान असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे सपत्नीक बारीपाडा येथे गेली होते. यावेळी जंगल परिसरात फिरताना त्यांना झाडांच्या फांद्यांवर हा चापडा साप दिसून आला. अशी माहिती देण्यात आली. हिरवट पिवळ्या रंगामुळे आणि अनोख्या अंगरचनेमुळे हा साप सहज लक्ष वेधून घेतो. दुर्मिळ साप पाहण्याची संधी मिळाल्याने त्यांनी लगेच त्याचा फोटो टिपला. या परिसरातील जैवविविधतेचे जतन केल्यानेच अशा संवेदनशील आणि दुर्मिळ प्रजाती टिकून राहतात, असे मत चैत्राम पवार यांनी व्यक्त केले.

चापडा सापाला हिरवा घोणस किंवा बॅम्बू पिट वायपर म्हणून ओळखले जाते. त्याचा पाठीचा रंग पिवळसर हिरवा असून, पोटाचा रंग पिवळा असतो. नाकपुड्या आणि डोळ्यांमधील छिद्रांमुळे तो पूर्ण अंधारातही भक्ष्य शोधू शकतो. लांबी एक ते दीड फूटांच्या दरम्यान असल्याने हा साप आकाराने मोठा नसतो, मात्र त्याचे अस्तित्व जंगलातील परिसंस्थेचे आरोग्य दर्शवते. काही सापांच्या अंगावर काळे ठिपके दिसतात, तर डोके मानेच्या तुलनेत अधिक रुंद असल्याने त्याची ओळख सहज पटते.

हा सर्प सह्याद्रीच्या दाट जंगलात सामान्यतः आढळतो परंतु धुळे जिल्ह्यात अत्यंत दुर्मिळ आहे. बारीपाडा आणि शेंदवड परिसरातील समृद्ध जंगलरचना, बांबूची वनराई आणि कारवीची झुडपे या सर्पासाठी योग्य अधिवास मानले जातात. वन्यजीव संरक्षण संस्था, पिंपळनेरचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या मते, या परिसरात अधूनमधून चापडा साप दिसून येणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने सकारात्मक संकेत आहेत.

स्वभावाने आक्रमक नसला तरी छेडल्यास तो डंख मारू शकतो. विषारी सर्पांपैकी एक असूनही त्याचे विष प्राणघातक नाही. हा साप निशाचर असून उंदीर, सरडे आणि पक्षी यांचे शिकार करतो. मादी सर्प थेट दहा ते बारा पिल्लांना जन्म देते. बारीपाडा जैवविविधता समितीचे अध्यक्ष आणि पद्मश्री चैत्राम पवार यांच्या अथक पर्यावरणवादी प्रमाणे या भागात निसर्गसंपन्नता टिकून राहण्यास मदत झाली आहे. बारीपाडा जंगलात दिसलेला चापडा साप हा स्थानिक पर्यावरण संवर्धनाच्या यशाचा ठळक पुरावा असल्याचे वनतज्ज्ञांचे मत आहे.