लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाद्वारे २०२२-२३ या वर्षात करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईअंतर्गत कार्यालयाच्या इतिहासात प्रथमच सात कोटींपेक्षा अधिक दंड वसुली झाली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली. कार्यालयाने या वर्षात सुमारे सात कोटी, ३५ लाख, ४० हजार रुपये दंड वसुली, तर एक कोटी, ३८ लाखांची करवसुली केली असून, शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या १०६ टक्के कामगिरी असल्याचेही लोही यांनी सांगितले.

या कालावधीत दोन्ही वायुवेग पथकांमार्फत रस्त्यावर अंमलबजावणी करताना विनाअनुज्ञप्ती वाहन चालविणारे २१३५, परवाना नसलेले ३९४, योग्यता प्रमाणपत्र नसलेले ३५५८, पीयूसी नसलेले २९९९, अवैध प्रवासी वाहतूक करणारे ८९८, अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणार्या खासगी बस १६५, अशा १० हजार १४९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा… जळगाव : पाचोरा बाजार समितीत स्वबळावर लढण्याचा भाजपाचा निर्णय

या पथकाच्या कारवाईअंतर्गत दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान न करणे ४४७१, सीटबेल्ट न वापरणे ११२५, वाहन चालविताना भ्रमणध्वनीचा वापर ७२२, विमा प्रमाणपत्र नसणारे ३३३५, अतिवेगाने वाहन चालविणारे ११९२, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणारे १७०, मालवाहू वाहनातून जादा भार करणारे ८७८ आणि लाल परावर्तक नसणारे २२८०, तसेच टपावरून मालाची वाहतूक करणार्या खासगी बस १३, अशा सुमारे १४ हजार १८६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा… उद्धव ठाकरे २३ एप्रिलला जळगाव जिल्हा दौऱ्यावर; पाचोरा येथे कार्यक्रमांच्या नियोजनासाठी उद्या जिल्हास्तरीय बैठक

जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत एकूण ८४३ रस्ते अपघातात एकूण ५६४ व्यक्तींचा मृत्यू झाला असून, अपघातात ७१९ जखमी झाले आहेत. जानेवारी ते मार्च २०२२ दरम्यानच्या तुलनेत जानेवारी ते मार्च २०२३ दरम्यान अपघातांच्या संख्येत १६ टक्क्यांनी घट झाली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rto collected more than seven crore fine in a year in jalgaon dvr