नंदुरबार –  राज्याच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा चार दिवसीय दौरा पुढे ढकलला गेल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दिवाळीप्रमाणे आनंदोत्सव पसरला. .समितीच्या दौऱ्यात प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी होणार असल्याची चिन्हे होती. परंतु, पूर परिस्थितीमुळे राज्य शासनाने सर्व समिती आणि आयोगाचे दौरे रद्द करण्याच्या सूचना दिल्यानंतर यंत्रणेने काहीसा सुटकेचा श्वास सोडला.

राज्याची अनुसूचित जमाती कल्याण समिती बुधवारपासून चार दिवसांसाठी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येणार होती. संमितीचे १६ आमदार आणि पाच मंत्रालयीन अधिकाऱी चार दिवस जिल्ह्यातील विविध विभागांची झाडाझडती घेणार असल्याने अनेकांना बुडबुडे फुटले होते. आमदार दौलत दरोडा  समिती प्रमुख असलेली ही समिती आदिवासीबहुल जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाकडून मिळणारा निधी. त्याचा खर्च, नागरिकांच्या समस्या याबाबतची तपासणी करणार असल्याने अनेक विभागांनी धास्ती घेतली होती.

समिती येणार म्हणून आदिवासी विकास विभागाने आपल्या शाळेच्या शिक्षक अधिकाऱ्यांचे समाज माध्यमातील ग्रुपवर आश्रमशाळा आणि वसतिगृह चकाचक ठेवण्याची सूचना केली होती. शाळेचे सर्व अभिलेख अद्ययावत व परिपूर्ण ठेवावेत, सर्व आश्रमशाळा वसतिगृह कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे, शालेय,वसतिगृह व इतर सर्व इमारतींची किरकोळ दुरुस्ती, फुटलेल्या काचा, दरवाजे,खिडक्या, संडास, बाथरूम दुरुस्ती, तुटलेले व गळके नळ, पंखे, ट्यूबलाईट व इतर सर्व प्रकारची दुरुस्ती करावी, सुंगधी द्रवाचा वापर करुन सर्व गोष्टी चकाचक ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

आश्रमशाळांनी वैद्यकीय संच, औषधे अद्ययावत ठेवावेत, मुदत संपलेली औषधे नष्ट करावीत, सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय शैक्षणिक साहित्य आणि इतर सर्व वस्तूंचे वाटप करावे, शासन नियमानुसार आपल्या सर्व विद्यार्थ्यांना नाश्ता,जेवण, दररोज भाजीपाला, मटण, मिष्टान्न व इतर पूरक आहार नियमितपणे द्यावा, सर्व वर्गांचा सर्व विषयांचा अभ्यासक्रम नियोजनानुसार पूर्ण करावा,.सर्व विद्यार्थ्यांचे वाचन,लेखन,बेरीज, वजाबाकी,गुणाकार भागाकार,या बाबतीत अप्रगत विद्यार्थ्यांना या मूलभूत बाबी शिकवून प्रगत करावेत, अशा सूचना झाल्या होत्या.

समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या या तातडीच्या सूचना पाहता इतर वेळेस आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील कारभार कसा असेल, हे दिसते. या सूचनांची पाच ते सहा दिवसांपासून अंमलबजावणी सुरु झाल्याने आश्रमशाळांमध्ये झालेल्या बदलाचा सुखद धक्का विद्यार्थ्यांना बसला होता. परंतु, समितीचा नियोजित दौरा पुढे ढकलला गेल्याने जिल्ह्यातील सर्व विभागांनी छुपा आनंद साजरा केला.