जळगाव – शालार्थ घोटाळ्याची व्याप्ती जळगाव जिल्ह्यापर्यंत पसरल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यानुसार पडताळणी न करता परस्पर ड्राफ्ट स्वीकारून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याची चौकशी आता केली जात आहे. या प्रकरणी जळगावमधील तब्बल ६८ शिक्षकांची लातूर येथील एसएससी बोर्डाच्या अध्यक्षांसमोर सुनावणी देखील झाली आहे.
शालार्थ घोटाळ्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेता संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे व संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांकडून काही दिवसांपूर्वी देण्यात आले आहेत. सदरचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदय पंचभाई आणि जळगाव येथील माध्यमिक वेतन पथकाचे अधीक्षक राजमोहन शर्मा यांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शाळांचे पदाधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाईचे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिले आहेत. त्याच कारवाईचा एक भाग म्हणून संबंधित सर्व ६८ संशयितांची सुनावणी लातूरमध्ये घेण्यात आली. त्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनीही दुजोरा दिला. संबंधितांवर आता काय कारवाई होते, त्याकडे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्यभरात २०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी असतानाही जळगाव जिल्ह्यात शिक्षण संस्थांचे चालक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांनी संगनमताने शालार्थ आयडी घोटाळा करून बेकायदेशीर शिक्षक भरती केल्याचा आरोप शिक्षण बचाव कृती समितीने केला आहे. या प्रकरणी संशयितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदनही कृती समितीच्या वतीने निवृत्त प्राचार्य डॉ.एस.एस.राणे, दिलीप जैन, मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले आहे.