नाशिक – शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत असताना सायबर गुन्हेगारी रोखण्याचेही त्यांच्यापुढे आव्हान आहे. नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नाशिकमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाची ७२ लाख रुपयांना तर, दुसऱ्या घटनेत सहा कोटी रुपयांना लूट करण्यात आली. आतापर्यंत अशा घटनांमध्ये सीबीआय, सीआयडी यांच्या नावाने धाक दाखविला जात होता. परंतु, नाशिकमधील अशा एका प्रकरणात भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या न्यायालयात हजर करण्याची धमकी देत फसवणूक करण्यात आली.
डिजिटल अरेस्टचा धाक प्रामुख्याने सेवानिवृत्तांना दाखविला जातो. नाशिक येथील उच्चभ्रु वसाहत असलेल्या गंगापूररोड भागात एक ७२ वर्षांचे सेवानिवृत्त अधिकारी राहतात. त्यांचा मुलगा नोकरी निमित्ताने परदेशात आहे. संबंधित सेवानिवृत्त व्यक्ती आणि त्यांची पत्नी दोघेही कायम आजारी असतात. त्यांच्या पत्नीला अर्धांगवायूमुळे त्या पडूनच असतात. घरातच त्यांच्या औषधोपचाराची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. या सेवानिवृत्त व्यक्तीच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती काढून सायबर भामट्याने त्यांच्याशी संपर्क साधला.
तुमच्या आधार कार्डवरून क्रेडीट कार्ड काढण्यात आले असून त्याव्दारे गैरव्यवहार करण्यात आल्याने तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले असल्याचीच धमकी देण्यात आली. तुम्हाला भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या न्यायालयात उपस्थित करण्यात आल्यावर ७२ लाख रुपयांचा दंड झाला आहे. दंड न भरल्यास सीबीआयचे पथक घरी येऊन अटक करतील आणि दिल्लीत घेऊन जातील, अशी धमकी व्हाॅटसअपवरुन देण्यात आली. २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत डिजिटल अरेस्ट करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले.
या धमकीमुळे पुरते हादरलेल्या सेवानिवृत्ताने बँकेत जाऊन आरटीजीएसव्दारे भामट्याने सांगितलेल्या बँकेच्या खात्यावर पैसे भरले. संबंधित सेवानिवृत्तास त्यांचे नातेवाईक भेटण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर गुन्हेगारीत वाढ होत असल्याने पोलिसांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
ज्येष्ठ नागरिक अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची विशेष माहिती नसणाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. असे भामटे आधी संबंधित व्यक्तीच्या बँक व्यवहारांची माहिती घेतात. बँक खात्यात किती पैसे आहेत, याची माहिती मिळवून सावज हेरतात. त्यामुळे व्हाॅटसअपवरुन कोणी अनोळखी व्यक्तीने संपर्क साधल्यास सावध राहावे, आपल्या घरातील किंवा परिसरातील एखाद्याची मदत घ्यावी, त्यास अशा प्रकारचा फोन आला असल्याचे सांगावे, प्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.