पेठ येथील मुलींच्या बालगृहात अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोन जणांना अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पेठ येथे आदिवासी महिला हक्क संरक्षण समितीचे मुलींचे बालगृह आहे. या ठिकाणी ५६ विद्यार्थिनी शिक्षण घेतात. बालगृहात पीडित विद्यार्थिनी २०१३ मध्ये दाखल झाली. बालगृहाच्या अध्यक्षा संशयित सुशीला अलवाड (४५) यांचा मुलगा अतुल (३०) हा मुख्य संशयित आहे. दिवाळीच्या सुटीत त्याने पीडितेवर अत्याचार केला. या संदर्भात तिने अध्यक्षांकडे तक्रार केली असता संशयित सुशीला यांनी उलट तूच आपल्या मुलाला त्रास देते असे सांगत तक्रारीकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतरही त्याने अनेक वेळा या घटनेची पुनरावृत्ती केली.
दरम्यान, सज्ञान झाल्याने तिला नुकतेच मागील आठवडय़ात नासर्डी पूल येथील मुलींच्या शासकीय अनुरक्षण गृहात दाखल करण्यात आले. त्यावेळी तेथील अधीक्षक एस. डी. गांगुर्डे यांच्याकडे तिने उद्भवलेला प्रकार सांगितला. असाच प्रकार अन्य काही विद्यार्थिनींसोबत घडला असल्याचे सांगितले. पीडितेचा दाखला मागण्यासाठी बालगृहाच्या अध्यक्षांना दूरध्वनी केला असता दाखल्याविषयी न बोलता त्यांनी मुलाविषयी किंवा संस्थेविषयी गुन्हा दाखल झाल्यास आत्महत्या करेल, पण त्यापूर्वी तुम्हा सर्वाची नावे चिठ्ठीत लिहून ठेवेल अशी धमकी दिली. गांगुर्डे यांनी या सर्व प्रकाराविषयी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हा गुन्हा पेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी पेठ पोलिसांनी संशयित अतुल व सुशीला यांना अटक केली. या प्रकरणी फारसे कोणी बोलण्यास तयार नाही. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.