नाशिक – मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांमुळे शहरवासीयांना अनेक भागात फिरणे अवघड झालेले असताना महानगरपालिका आता भटक्या, मोकाट मांजरींची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणार आहे. म्हणजे, ज्यांचा रस्ते व प्रमुख चौकात नागरिकांना त्रास होतो, त्यावर उपाय योजण्याऐवजी लवकर दृष्टीपथासही न पडणाऱ्या भटक्या मांजरींना पकडून निर्बिजीकरण करण्यात येणार आहे.

मागील काही वर्षात शहरात मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत आहे. अलीकडेच गांधीनगर कर्मचारी वसाहतीत मोकाट जनावरांच्या हल्ल्यात एक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला होता. शहरातील भाजी बाजार परिसरात मोकाट जनावरांची गर्दी असते. या जनावरांकडून कधीकधी हल्ल्याचे प्रकार घडतात. अनेकदा ही जनावरे रस्त्यात ठाण मांडून वाहतुकीला अडथळे निर्माण करतात. कॉलनी रस्ते व चौकात ठिय्या देणाऱ्या भटक्या व मोकाट कुत्र्यांनी रात्री पायी वा गाडीवर फिरणे अवघड झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे, महापालिका दरवर्षी भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण शस्त्रक्रियेेवर मोठा निधी खर्च करते. मात्र, तरीदेखील कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे.

या परिस्थितीत मनपाच्या पशूसंवर्धन विभागाने मोकाट, भटक्या मांजरींची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणे आणि ॲँटीरेबीज लस देण्याच्या ठेवलेल्या प्रस्तावास मनपाच्या सर्वसाधारण सभेत मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी मान्यता दिली. मनपा क्षेत्रात भटक्या मांजरींचा उपद्रव आणि तक्रारी कमी करण्यासाठी त्यांची उत्पत्ती थांबविणे व त्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी मांजरींवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचा मुद्दा प्रस्तावात मांडण्यात आला. मोकाट, भटक्या मांजरींना पकडून निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी वर्षभरासाठी २० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. इ निविदा प्रक्रिया राबवून हा खर्च करण्यास सभेत मान्यता देण्यात आली.

भटक्या कुत्र्यांवरही कोट्यवधींचा खर्च

भटक्या आणि मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर महापालिका दरवर्षी एक कोटीहून अधिकचा खर्च करते. मागील १० वर्षात साधारणत: ८० हजार मोकाट कुत्र्यांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या काळात या प्रक्रियेवर सुमारे १० कोटीहून अधिकचा निधी खर्ची पडला. मोकाट कुत्र्यांची संख्या किती आटोक्यात आली, हा प्रश्न आहे.