जळगाव: महापालिका प्रशासनाचा कोणताच धाक शिल्लक न राहिल्याने शहरात कोणीही कुठेही जागा मिळेल तिथे मांस विक्रीचे दुकान सध्या थाटत असून, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढण्यास परिणामी चालना मिळाली आहे. उघड्यावरील मांस विक्रीला प्रतिबंध घातला जात नसल्याने, शहरातील भटके कुत्रे अधिक हिंसक झाल्याचेही निदर्शनास आले आहे.

महापालिकेने उघड्यावरील अनधिकृत मांस विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम काही दिवसांपूर्वी राबवली होती. आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण करून तबब्ल १२४ विक्रेत्यांना नोटीस देखील बजावल्या होत्या. याशिवाय, संबंधित मांस विक्रेत्यांचे लोखंडी पिंजरे, सुरे, लाकडी पाट, तंबू यासारखे साहित्य जप्त करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कारवाईत सातत्य न राहिल्याने मांस विक्रेत्यांनी पुन्हा दुकाने थाटली. सध्या शहरात दोनशेपेक्षा जास्त विक्रेते उघड्यावर मांस विक्री करत असून, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. उघड्यावरील मांस विक्रीमुळे परिसरातील नागरिकांना माशांची उत्पत्ती, भटक्या कुत्र्यांचा त्रास आणि दुर्गंधी या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील कोणत्याही भागात मटन, चिकन आणि मासे विक्रीची दुकाने दिसतात. काही ठिकाणी तर भरवस्तीत घरासमोर गाळा काढून मांस विक्री केली जात आहे. ज्यामुळे आयते खाद्य सहजपणे मिळत असल्याने भटक्या कुत्र्यांची हिंसक वृत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

महापालिकेचे मटन मार्केट ओस

जळगाव शहरातील उघड्यावरील मांस विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेने शाहूनगर, भास्कर मार्केट आणि कोंबडी बाजार परिसरात काही वर्षांपूर्वी मटन मार्केटची उभारणी केली होती. मात्र, शहरात गल्लोगल्ली कुठेही मांस सहजपणे मिळत असल्याने नागरिकांना मटण मार्केटमध्ये जाण्याची गरजच भासत नाही. मार्केटमध्ये दुकान लावले तरी तिकडे ग्राहक फिरकत नसल्याने विक्रेत्यांना हातावर हात धरून बसावे लागते. त्यामुळे शहरातील बहुसंख्य मटण मार्केटचा वापर आता थांबला असून, महापालिका प्रशासन देखील तिकडे ढुंकून पाहण्यास तयार नाही.

जळगाव शहरात सद्यःस्थितीत ५० अधिकृत आणि जवळपास १४५ अनधिकृत मांस विक्रेते आहेत. भटक्या कुत्र्यांचा त्रास थांबविण्यासाठी उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. – उदय पाटील (सहायक आयुक्त, आरोग्य विभाग, महापालिका, जळगाव)