नाशिक : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून राज्यातील कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांदा बाजारभावातील घसरण थांबविण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी आ. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने किलोला २५ रुपये दर देण्याची मागणी कांदा उत्पादकांनी केलेली आहे. याच मुद्दय़ावरून १६ ऑगस्टपासून कांदाविक्री बंद करण्याचा इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सद्य:स्थितीत रब्बी (उन्हाळ) कांद्याची विक्री सर्वसाधारण सरासरी ८०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे होत आहे. गेल्या १५ दिवसांतील कांदा बाजारभावाचा विचार करता बाजारभाव स्थिर असल्याने सध्या मिळत असलेल्या दरात शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळणेही अवघड झाले आहे. या वर्षी गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल या राज्यांसह महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी घटली आहे. त्यात बांगलादेशने कांदा आयातीवर निर्बंध टाकल्याने व श्रीलंका आर्थिक संकटात असल्याने कांद्याची निर्यात ठप्प झालेली आहे. भारताच्या या दोन्ही प्रमुख आयातदार देशांमध्ये भारतीय कांदा निर्यात होत नसल्याने मागणीअभावी कांद्याची बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. दरात घसरण सुरू राहिल्यास केंद्र शासनाच्या ध्येयधोरणांबाबत शेतकरी बांधवांमध्ये असंतोष निर्माण होऊन आंदोलने होण्याची शक्यता असल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take measures to stop the decline in onion prices amy
First published on: 06-08-2022 at 00:04 IST