धुळे : दिवाळी तसेच इतर सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या विविध जाहिराती येण्यास सुरुवात होते. ऑनलाईन खरेदीसाठी विविध प्रकारची प्रलोभने ग्राहकांना दाखविली जातात. इतरांपेक्षा किती कमी किमतीत वस्तू मिळत आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. ऑनलाईन खरेदीच्या या प्रलोभनांना बहुसंख्य ग्राहक भुलतात. आणि काही वेळा त्यांची फसगत होते. त्यामुळे ग्राहकांनी विक्रेत्यांच्या आमिषाला बळी पडू नये, खात्री करूनच खरेदीसाठीचे व्यवहात करावेत, असा इशारा सायबरतज्ज्ञ ॲड. चैतन्य भंडारी यांनी दिला आहे.
काही वर्षांत दिवाळी, नववर्ष आणि इतर सणांच्या निमित्ताने ऑनलाईन खरेदी वाढली आहे. कपडे, कॉस्मेटिक, भेटवस्तू आणि गृहोपयोगी वस्तू मोठ्या प्रमाणावर ग्राहक ऑनलाईन खरेदीसाठी निवडतात.सणासुदीच्या काळात समाज माध्यमात खोटी प्रलोभने, बनावट वेबसाइट्स आणि नकली डिलिव्हरी कॉल्सच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे ॲड. चैतन्य भंडारी यांनी नमूद केले आहे.
काही प्रकरणांमध्ये पैसे दिल्यानंतर वस्तू मिळाल्या नाहीत, वेबसाइट गायब झाली किंवा बँक/कार्डवरील माहिती चोरी झाली आहे. काही चोरटे कुरिअर डिलिव्हरीच्या नावाखाली ओटीपी मागून फोन हॅक करण्याचा प्रयत्न करतात. या अनुषंगाने सायबर तज्ज्ञांनी ग्राहकांना सल्ला दिला आहे. ऑनलाईन खरेदी करताना केवळ अधिकृत वेबसाइट्स किंवा ॲप वापरावेत, आकर्षक प्रलोभनांवर लगेच विश्वास ठेवू नये, व्यवहार करताना ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ किंवा विश्वासार्ह पेमेंट गेटवे वापरावा, आणि कुणालाही ओटीपी किंवा बँकेसंदर्भातील माहिती सांगू नये, असे चैतन्य भंडाी यांनी नमूद केले आहे.
सध्या प्रतिष्ठित ई-कॉमर्स कंपन्यांचे दिवाळीनिमित्त सेल चालू आहेत. मात्र सायबर चोरटे बनावट वेबसाइट तयार करून खोट्या ८०-९० टक्के सवलती दाखवून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. डिस्काऊंट व्हाउचर लिंकवर क्लिक करणे, लिंकवरून माहिती भरणे टाळावे आणि मोबाइल किंवा लॅपटॉपमध्ये पेड अँटीव्हायरस वापरावा, असे तज्ज्ञांनी सांगितले. सायबरतज्ज्ञ ॲड. चैतन्य भंडारी आणि डॉ. रोहन न्यायाधीश यांनी नागरिकांना सूचित केले आहे की, दिवाळीत ऑनलाईन खरेदी करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन प्रलोभनांना बळी न पडता जी वस्तू ऑनलाईन खरेदी करायची आहे, ती योग्य ई काॅमर्स कंपन्यांकडूनच खरेदी करावी, खरेदी करताना आर्थिक व्यवहाराची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.