नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये विजेच्या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथे राहणारे दगडु निंबेकर (४४) हे परिसरातील एका फार्म हाऊसवर कामावर असतांना अचानक वीज गेली. पर्यवेक्षकाने निंबेकर यांना वीज का गेली, हे पाहण्यासाठी पाठविले. निंबेकर वायरची तपासणी करत असतांना विजेचा धक्का बसला. कामावरील अन्य लोकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना सिन्नर तालुक्यात घडली. बीड येथील गोपाळ घोरपडे यांनी माळेगाव एमआयडीसीतील एका हॉटेलच्या शेजारी असलेल्या वेल्डिंग दुकानासमोर मालवाहतूक वाहन उभे केले. मालमोटारीवर चढून लोखंडी साहित्य खाली घेण्यासाठी उचलले असता त्या साहित्याचा वाहनाच्या वरील बाजूला असलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाला. त्यामुळे घोरपडे यांनाही विजेचा धक्का बसल्याने ते जबर जखमी झाले. त्यांना सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिसरी घटना कळवण तालुक्यात घडली. राकेश आहेर (३९, रा. निवाणे) यांना शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटार चालु करतांना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
विजेचा धक्का लागू नये यासाठी सावधगिरीचा इशारा
विजेचा धक्का लागू नये, यासाठी घरी किंवा कामाच्या ठिकाणी ओल्या हाताने स्विच, प्लग किंवा वायरला हात लावू नये, वीज उपकरणे नेहमी कोरड्या ठिकाणी वापरावीत, तुटके, सैल किंवा उघड्या तारा बदलाव्या, बाहेर रस्त्यावर असतांना पावसाळ्यात किंवा पाणी साचलेल्या ठिकाणी उघड्या तारांपासून, खांबापासून दूर राहावे, वीज खांबाखाली उभे राहू नये, ओल्या जमिनीवर उभे राहुन विद्युत उपकरणे वापर करू नये, वीजपुरवठा बंद करूनच दुरूस्ती करावी, सुरक्षेसाठी रबरचे हातमोजे, बूट वापरावेत.