नाशिक – नाशिकजवळील वडनेर दुमाला भागात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री बालक घरासमोरील ओट्यावर खेळत असताना बिबट्याने त्याला उचलून नेले. चार ते पाच तासानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. रक्षाबंधनच्या दिवशी आठ वर्षीय बहीण श्रेयावर मृत लहानग्या भावास अखेरची राखी बांधण्याचा कटू प्रसंग ओढावला. यावेळी श्रेयासह उपस्थितांच्या अश्रूचा बांध फुटला.

देवळाली कॅम्प भागात तोफखाना केंद्राच्या फायरिंग रेंजलगत नागरी वसाहतीचा मळे परिसर आहे. शुक्रवारी रात्री आयुष भगत हा त्याची आठ वर्षीय बहीण श्रेयाबरोबर घराबाहेर ओट्यावर खेळत होते. काही वेळासाठी श्रेया घरात गेली असता बिबट्याने आयुषवर झडप मारून त्याला शेतात ओढून नेले. कुटुंबिय घराबाहेर आल्यानंतर आयुष दिसला नाही. परिसरात रक्त सांडल्याचे दिसल्यावर कुटुंबियांनी स्थानिकांच्या मदतीने अंधारात शोध सुरू केला. वन विभागाने थर्मल ड्रोन तर पोलिसांच्या श्वान पथकही शोध कामात लागले. रात्री उशिरा आयुषचा मृतदेह हाती लागला. रक्षाबंधनच्या दिवशी अंतिम विधीसाठी आयुषचे पार्थिव काही काळ घरी आणण्यात आले. तेव्हा श्रेयाच्या अश्रुंचा बांध फुटला. मयत आयुषला अखेरची राखी बांधून तिने निरोप दिला. हा प्रसंग पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. आयुषवर वडनेर गावात अंतिम संस्कार करण्यात आले.

जेरबंद बिबटे लगतच्या भागात सोडल्याचा आरोप

लष्करी हद्दीलगतच्या गाव व मळे भागात बिबट्याचा कायम मुक्त संचार असतो. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले जातात. मात्र तो जेरबंद होण्यासाठी खाद्य टाकले जात नाही. महत्वाचे म्हणजे कधीतरी बिबटे जेरबंद झाले की, त्यांना पुन्हा सभोवतालच्या लष्करी हद्दीतील जंगलात सोडले जाते, परिणामी, ते पुन्हा पाणी, खाद्याच्या शोधात नागरी भागात येतात, असा आरोप माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी केला. स्थानिक माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी बिबट्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली.

चार पिंजरे, तीन ट्रॅप कॅमेरे

दुमाला भागात आधीच दोन पिंजरे लावण्यात आले होते. या घटनेनंतर आणखी दोन पिंजरे लावण्यात येत असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी दिली. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तीन ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बिबट्या रात्रीतून चार ते पाच किलोमीटर अंतर भ्रमंती करू शकतो. याचा अंदाज घेऊन पिंजऱ्याचे ठिकाणही बदलावे लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जेरबंद झालेले बिबटे १५० ते २०० किलोमीटर अंतरावर जंगलात सोडले जातात असे त्यांनी म्हटले आहे.