नाशिक : जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये बिबट्यांचा संचार आणि हल्ले वाढल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करावा तरी कसा, अशी चिंता वन विभागाला सतावू लागली आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे वन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांंना नागरिकांचा रोष सहन करावा लागत आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बिबट्याचे वर्षभरात आठपेक्षा अधिक बळी गेले आहेत. प्रामुख्याने नाशिक, इगतपुरी आणि सिन्नर या तीन तालुक्यांमध्ये बिबट्याचा अधिक वावर असल्याचे आणि हल्ले झाल्याचे दिसून आले आहे. देवळा तालुक्यातही बिबट्याने आता हल्ले सुरु केले आहेत. शुक्रवारी सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले.
नाशिक तालुक्यातील वडनेर दुमाला, देवळाली कॅम्प, विहितगाव या परिसरात मागील दोन महिन्यात बिबट्याचे हल्ले अधिक झाले.आर्टिलरी सेंटरच्या वसाहत परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्या बालकाचा बळी गेल्यानंतर परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने पिंजरे लावण्यात आले. पंधरा दिवसांपूर्वी कुरेशी सय्यद यांच्या नातवावर बिबट्याने हल्ला करत त्याला ओढण्याचा प्रयत्न केला होता.
झाडांची छाटणी आणि साफसफाईसाठी आलेल्या मजुरांना बिबट्या दिसला होता. या परिसरात तीन महिन्यांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी पहाटे बिबट्या जेरबंद झाला. दरम्यान, नागरिकांनी बाहेर पडतांना खबरदारी बाळगावी, अनावश्यक फिरणे टाळावे, जनावरांना बेवारस न सोडण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. नाशिक शहरालगतच्या भागात वन विभागातर्फे अशी खबरदारी घेण्यात येत असताना देवळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शुक्रवारी सायंकाळी दोन जण जखमी झाले.
देवळा तालुक्यातील भवरी मळा ,रामननर रस्त्याने सुनील ठाकरे (४८) आणि त्यांचा मुलगा किशोर (१९) मोटारसायकलने आपल्या शेतात जात असतांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात दोघे जखमी झाले. आसपासच्या नागरिकांनी त्यांना दहिवडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले .वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र पवार यांनी जखमींवर उपचार करून घरी पाठवले. या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, याअगोदर बिबट्याने अनेक जनावरांवर हल्ला केल्याचे नागरिकांनी सांगितले.
या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने याची दखल घेऊन या बिबट्या चा पिंजरा लावून बंदोबस्त करावा ,अशी मागणी करण्यात आली आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे वन अधिकारी, आणि वन कर्मचाऱ्यांवरच नागरिकांचा संताप निघू लागला आहे. शेतीकामांनाही बिबट्याच्या भीतीमुळे अडचण येऊ लागली आहे. कसेही करा आणि बिबट्यांचा बंदोबस्त करा, अशी नागरिकांची मागणी आहे.