नाशिक : मुलीचा पाठलाग करून छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेवर आणि तिच्या बहिणीवर शस्त्राने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी संशयिताविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीतल आढाव या कुटुंबासमवेत राहतात. त्यांची अल्पवयीन मुलगी मंगळवारी महाविद्यालय सुटल्यावर घरी येत असताना आढाव कुटुंबीयांच्या ओळखीतील शुभम चव्हाण आणि त्याचे काही मित्र पाठलाग करत घरापर्यंत आले. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला. आई आणि मावशी मंगला शिरसाठ या घराबाहेर आल्या. परंतु, तोपर्यंत संशयित पळून गेले.

या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी आढाव आणि शिरसाठ या शुभमच्या घरी गेल्या. त्या वेळी त्याने दोघींना शिवीगाळ करून मारहाण केली. शिरसाठ त्याला समजाविण्याचा प्रयत्न करत असताना त्याने दोघींच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले.  शिरसाठ यांच्या हातावर, तर आढाव यांच्या छातीवर शस्त्राने वार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी परिसरातील लोक जमा होताच संशयित शुभम पळून गेला. पीडित मुलीला या प्रकाराची माहिती समजताच तिने जखमी आई, मावशी यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी संशयित शुभमविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.