मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात सोनसाखळी चोरट्यांनी अक्षरशः हैदोस मांडला आहे. मात्र,अशा घटनांमध्ये पकडण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याने चोरट्यांची भीड चेपली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. मंगळवारी लोढा भवन येथील उच्चभ्रू वस्तीत अज्ञात दुचाकीस्वाराने रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दिवसाढवळ्या हिसकावून नेण्याचा प्रकार घडला आहे. सोनसाखळी खेचताना या चोरट्याने एवढा जोरात हिसका दिला की, ही महिला चक्क रस्त्यावर आपटली गेली. या प्रकारावरून सोनसाखळी चोरटे आता महिलांच्या जीवावर उठले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास हातात पिशवी घेतलेली एक वृद्ध महिला मोसम पुलाकडून लोढा भवन वस्तीतून पायी जात होती. त्याच वेळी पाठीमागून आलेला अज्ञात दुचाकीस्वार या महिलेच्या पुढे काही अंतर गेला व पुन्हा माघारी वळला. दुचाकी खेटून घेत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून तो लगेच पसार झाला. सोनसाखळी खेचण्याच्या या घटनेत जोरात हिसका बसल्याने ही महिला रस्त्यावर आपटली गेली. अचानक घडलेल्या या घटनाक्रमामुळे गोंळलेल्या या महिलेला थोडा वेळ तर काही सुचत देखील नव्हते.

सोनसाखळी खेचून नेणाऱ्या या दुचाकीस्वाराने डोक्यात हेल्मेट घातले होते. हा सर्व प्रकार ‘सीसीटीव्ही’ चित्रणात कैद झाला आहे. या संदर्भात अद्याप गुन्हा दाखल झालेल्या नाही. तसेच महिलेचे नावही समजू शकले नाही. परंतु घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपलब्ध सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे छावणी पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे. प्राथमिक तपासात चोरट्याची दुचाकी नाशिकच्या दिशेने निघाल्याचे निष्पन्न झाले असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळल्या जातील,असा विश्वास पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी व्यक्त केला.

सकाळी अथवा सायंकाळी रस्त्यावरून फिरणाऱ्या किंवा मंदिरात जाणाऱ्या विशेषतः वृद्ध महिलांना सोनसाखळी चोरट्यांकडून लक्ष्य करण्याच्या घटना शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. कधी काहीतरी विचारण्याचा बहाणा करत रस्त्याने जाणाऱ्या महिलांना थांबवून तर कधी काही कळण्याच्या आतच महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून दुचाकीवरील चोरटे पसार होत असतात. यामुळे महिला वर्गात मोठ्या प्रमाणावर असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

ओळीने घडणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांचा तपास लावण्यात पोलिसांना यश न येणे हा शहरात चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे येथील सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे गेल्या महिन्यात मालेगाव भेटीवर आलेले जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या कानावर हा विषय घालण्यात आला होता. परंतु त्यात कुठलाही फरक पडत असल्याचे दिसून येत नाही. किंबहुना सोनसाखळी खेचत असताना दुचाकीस्वाराकडून महिलेला रस्त्यावर आपटण्याच्या ताज्या प्रकरणावरून चोरट्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून त्यांना लोकांच्या जीवाची देखील आता पर्वा राहिली नसल्याचे दिसून येते आहे.