नाशिक – जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असताना रविवारी सायंकाळी वणी गडावर जाणाऱ्या घाट मार्गावर दरड कोसळून रस्ता बंद झाला होता. यावेळी स्थानिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दगड, माती बाजुला करीत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. घाटमाथा परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. रविवारी अनेक भागास पावसाने झोडपले. नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान रविवारी सायंकाळी सप्तश्रृंगी गडावरील घाट मार्गात दरड कोसळली. नांदुरीहुन गडावर जाणारा हा मार्ग आहे. दरड कोसळल्याने भाविकांची वाहने व राज्य परिवहन महामार्गाच्या बसेस घाट मार्गात अडकून पडल्या. या घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके व त्यांचे सहकारी, स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. भर पावसात दगड व माती बाजूला करून भाविकांच्या अडकलेल्या वाहनांसाठी रस्ता मोकळा करून दिला. पालकमंत्री दादा भुसे यांच्या सूचनेनंतर बांधकाम विभागामार्फत यंत्रसामग्री पाठवून रस्त्यावरील मातीचा ढिगारा बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.