धुळे – नरडाणा ते बोरविहीर रेल्वेमार्गाच्या अनुषंगाने धुळे तालुक्यातील मौजे पिंपरी ते वडजाई दरम्यान उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या कामाला तीव्र विरोध करून गावकऱ्यांनी एकजुटीने काम बंद पाडले. हे काम रेटून नेण्याचा प्रयत्न केल्यास चुकीच्या ठिकाणी उभारण्यात येणारा उड्डाणपूल पाडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी दिला. नरडाणा ते बोरविहीर रेल्वेमार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी रोहन कुवर यांना निवेदन दिले. उड्डाणपुलास विरोधामागील कारण निवेदनात मांडण्यात आले आहे. नरडाणा ते बोरविहीर रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यासह विविध कामे सुरु आहेत. धुळे तालुक्यातील मौजे पिंपरी ते वडजाई रोड शिवारातही याच प्रकल्पाचा भाग असलेल्या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे.
परंतु, हा उड्डाणपूल भौगोलिकदृष्ट्या गावांच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने चुकीच्या दिशेने बांधण्यात येत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. सध्या चालू असलेल्या ठिकाणीच जर पुलाचे बांधकाम झाले, तर प्रत्यक्षात मूळ रस्त्याची दिशाच बदलेल. नागमोडी वळण घेवून गावकरी, शेतकऱ्यांना ये-जा करावी लागणार आहे. त्यामुळे मोठी गैरसोय होणार आहे. उड्डाणपूल उभारताना शेतकरी, गावकऱ्यांचे म्हणणे जाणून घेणे आवश्यक होते. परंतु, तसे न करता काम करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. हा उड्डाणपूल आहे त्याच जागीर झालाच तर भविष्यात अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. परिसरातील पिंपरी, वडजाई, बाभूळवाडी, सौंदाणे, नरव्हाळ या गावातील लोक या मार्गाचा मुख्य रस्ता म्हणून वापर करतात.
धुळे शहरात येण्यासाठी मुख्य रस्ता हाच असल्याने भविष्यात या ठिकाणी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. या अनुषंगाने या रस्त्याचे काम त्वरित थांबवावे आणि उड्डाणपुलाचे झालेले बांधकाम पाडून त्याची जागा बदलावी. अन्यथा ग्रामस्थ आणि शेतकरी चुकीच्या ठिकाणी उभारण्यात येणारा उड्डाणपूल पाडतील, असा इशारा यावेळी संतप्त गावकऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांकडून यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. गावकरी, शेतकरी यांच्या भावनांचा विचार करण्यात यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी नरडाणा-बोरविहीर संघर्ष समितीचे जयेश चौधरी, तुषार देवरे, भूषण देवरे, अभिजित देवरे, सोहेल अन्सारी, अमन अन्सारी, सुरेश चौधरी, सचिन पाटील, माजी सरपंच मच्छिन्द्र देवरे, माजी सरपंच धर्मेंद्र देवरे, महेंद्र सूर्यवंशी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.