जिल्ह्य़ातील १५ मतदारसंघांत ४५ लाख २४ हजार ६६३ मतदार

मतदानास केवळ सहा दिवसांचा अवधी राहिल्याने कमी वेळात मतदार चिठ्ठी वितरणाचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. मालेगाव बाह्य़ विधानसभा मतदारसंघात मतदार चिठ्ठी वाटपास सुरुवात करण्यात आली असून इतर मतदारसंघातही ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची तयारी प्रगतिपथावर आहे.

निवडणूक आयोगाच्या पथकाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार चिठ्ठय़ांचे वाटप विहित मुदतीत करण्याची सूचना केली होती. यानंतर निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्ह्य़ातील १५ मतदारसंघांत ४५ लाख २४ हजार ६६३ मतदार आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक तीन लाख ९८ हजार ९२६, तर सर्वात कमी दोन लाख ५९ हजार मतदार इगतपुरीमध्ये आहेत. सर्वसाधारणपणे प्रत्येक मतदारसंघात सरासरी पावणेतीन लाख मतदार असल्याचे दिसून येते. या सर्व मतदारसंघांत २१ ऑक्टोबरला मतदान होत आहे. तत्पूर्वी, मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठींचे वाटप होणे आवश्यक आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून ही लगबग सुरू झाली आहे. मालेगाव बाह्य़ मतदारसंघात ३०८ यादी भागांच्या चिठ्ठी वाटपाचे काम सुरू करण्यात आले. या मतदारसंघात एकूण तीन लाख ४० हजार ९११ मतदार आहेत. यामध्ये एक लाख ७९ हजार ४६८ पुरुष, तर एक लाख ६१ हजार ४४० महिला आणि तीन तृतीयपंथी आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून मतदान चिठ्ठींचे वाटप योग्य पद्धतीने व्हावे यासाठी त्यांच्या पर्यवेक्षकांनाही तपासणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. यात आढळून येणाऱ्या मयत मतदारांच्या याद्या तातडीने निवडणूक कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. चिठ्ठय़ांचे वाटप तातडीने होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी आणि सर्व विभागप्रमुखांना त्यांच्या कार्यालयीन कामकाजात सवलत देण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांनी संबंधितांना दिले. निवडणूक यंत्रणा मतदार चिठ्ठय़ांचे वाटप करीत असली तरी ही चिठ्ठी मतदाराच्या ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही.

केंद्राबाहेर चिठ्ठय़ांचे वितरण नाही

ज्या मतदार चिठ्ठय़ा वाटप होणार नाहीत त्या पुन्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात जमा करायच्या आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर त्यांचे वाटप होणार नाही. त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी केवळ वर्णानुक्रमाच्या याद्या घेऊन मतदारांना साहाय्य करण्यासाठी उपस्थित असतील, अशी माहिती मिसाळ यांनी दिली.