धुळे – शहरातील देवपूर भागासह अल्पसंख्यांकबहुल भागात १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने ठाकरे गटाच्या नेतृत्वात देवपुरातील महिलांनी महानगर पालिकेवर हंडा मोर्चा आणला. तर, समाजवादी पक्षानेही महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.
आंदोलनात संगीता जोशी, मनीषा शिंपी, उज्वला कोतकर, शिल्पा जाधव, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, धीरज पाटील, विधानसभा संघटक ललित माळी, देवीदास लोणारी तर, समाजवादी पक्षाचे जमिल मन्सूरी, डॉ. सर्फराज शेख, फातिमा अन्सारी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शहरासाठी मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध असतानाही मनपातील सत्ताधारी भाजपाकडून धुळेकरांची दिशाभूल करण्यात येत आहे. तसेच खासदार, महापौर हे वारंवार खोटी आश्वासने देऊन भूलवित आहेत. नियोजनाअभावी आणि सत्ताधाऱ्यांच्या मनपातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्यानेच धुळेकरांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेने योग्य नियोजन करून धुळेकरांना वेळेवर पाणी पुरवठा करावा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.