तातडीने आरोग्यसेवा पुरवणारी सुविधा १० दिवसांपासून ‘आजारी’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१०८ क्रमांक फिरवा आणि काही मिनिटांत रुग्णवाहिका मदतीला धावून येईल, हा सरकारचा दावा कळंबोली येथे फोल ठरला आहे. वाहतूक शाखेसमोर उभ्या करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेत गेल्या १० दिवसांपासून एकही डॉक्टर नाही. भारत उद्योग समूह (बीव्हीजी) या कंपनीला ही रुग्णवाहिका वेळेत घटनास्थळी पोहोचविण्याचे काम सरकारने दिले आहे.

कळंबोली सर्कल हे सहा महामार्गाना एकत्र आणणारे ठिकाण असल्यामुळे येथे वाहतूककोंडी व अपघातांचे प्रमाण मोठे आहे. पाच वर्षांत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये ५०० जणांना प्राण गमवावे लागले. दीड वर्षांपासून १०८ रुग्णवाहिकेची सेवा मिळू लागली आहे. अपघातग्रस्तांना वेळेवर मदत मिळावी आणि जखमी वा रुग्ण रुग्णालयात पोहोचण्याआधीच, प्रवासादरम्यान त्याला डॉक्टरांचे उपचार मिळण्यास सुरुवात व्हावी, ही यामागची कल्पना होती.

कळंबोली सर्कल येथे असलेली रुग्णवाहिका शोभेपुरतीच आहे. त्यामध्ये कधी चालक नसतात तर कधी डॉक्टर. तालुक्यात कळंबोली सर्कलसह आजिवली, पनवेलचे ग्रामीण रुग्णालय आणि खालापूर टोल नाका येथे चार रुग्णवाहिका तैनात आहेत. मात्र रुग्णांचा संदेश गेल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणाहून अपघातग्रस्तांना मदत मिळत नाही. वाहनचालक व डॉक्टर नसल्यामुळे लांबच्या अंतरावरून रुग्णवाहिका मागवावी लागत आहे.

गेल्या महिन्यात खोपोली येथील एक व्यक्तीला कळंबोली सर्कल येथे अपघात झाला. हाकेच्या अंतरावर रुग्णवाहिका असूनही त्याला सेवा मिळू शकली नाही, असे वाहतूक पोलीस सांगतात.

कळंबोली सर्कल येथे उभ्या असणाऱ्या रुग्णवाहिकेवरील डॉक्टर त्यांच्या आईची प्रकृती ठीक नसल्यामुळे काही दिवसांपासून रजेवर आहेत. त्यांच्या जागी डॉ. राहुल गोडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते आजपासून नेमणुकीस असतील. चालक हा रुग्णवाहिकेच्या जवळच्या खोलीत असल्यामुळे चालक रुग्णवाहिकेत नाही, असे होत नाही. महिन्याभरात किती रुग्णांना या रुग्णवाहिकेचा लाभ झाला याची आकडेवारी लवकरच दिली जाईल. रायगड जिल्ह्य़ात डॉक्टरांचा तुटवडा असल्यामुळे काही ठिकाणी रुग्णवाहिकांवर डॉक्टर नेमण्यास उशीर होतो.  
– डॉ. सुमीत उपाध्याय, जिल्हा व्यवस्थापक, बीव्हीजी कंपनी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 108 ambulance service fail in kalamboli