नवी मुंबई : खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या विरोधात महावितरणमधील २३ पैकी ७ वीज कर्मचारी संघटनांनी ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान राज्यव्यापी संप पुकारला आहे. यात नवी मुंबईतील सुमारे ८० टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले असून, त्यामुळे शहरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरणकडून पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

संपकाळात अखंड वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व आपत्कालीन नियोजन पूर्ण झाले आहे. गंभीर कारणांशिवाय घेतलेल्या सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, आवश्यकतेनुसार पर्यायी मनुष्यबळ, कंत्राटी कर्मचारी आणि स्थानिक पातळीवरील तांत्रिक यंत्रणा तात्पुरती नियुक्त करण्यात आली आहे. उपकेंद्र, नियंत्रण कक्ष आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले असून, राज्यभरातील वीजपुरवठ्याची स्थिती दर तासाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मुख्यालयास कळविण्यात येणार आहे. अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

राज्य शासनाने वीज सेवा अत्यावश्यक असल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू केला आहे. त्यामुळे या सात संघटनांचा संप बेकायदेशीर ठरला आहे. तरीही कृती समितीकडून संप मागे घेण्यास नकार देण्यात आला आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. ज्यांची सेवा एक वर्षापेक्षा कमी आहे किंवा जे नुकतेच भरती प्रक्रियेत निवडले गेले आहेत, त्यांची सेवा संपात सहभागी झाल्यास तत्काळ रद्द करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

खासगीकरण आणि फेररचनेच्या मुद्द्यांवर संयुक्त कृती समितीने आंदोलन उभारले असले, तरी महावितरणने कोणतेही खासगीकरण झालेले नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. एप्रिल २०१९ नंतर उभारलेल्या ३२९ उपकेंद्रांचे संचालन महावितरणकडेच असून, केवळ बाह्यस्त्रोत मनुष्यबळासाठी निविदा प्रक्रिया झाल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. तसेच, नवीन कार्यालयीन रचनेमुळे अभियंते आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदसंख्या ८७६ ने वाढली असून कोणतीही कपात झालेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, संपकाळात विशेषतः घरगुती ग्राहक, पाणीपुरवठा योजना, रुग्णालये, शासकीय कार्यालये आणि मोबाईल टॉवर आदींचा वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे. रोहीत्र, वीजतारा, केबल्स, डिस्ट्रीब्युशन बॉक्स, वाहने यासारखी आवश्यक साधनसामग्री सर्व विभागीय कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संपकाळात कोणत्याही चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये आणि वीजसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तसेच, वीजपुरवठ्याबाबत तक्रार किंवा चौकशीसाठी १९१२, १८००-२१२-३४३५ आणि १८००-२३३-३४३५ हे टोल-फ्री क्रमांक २४ तास कार्यरत असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. “संप काळात नवी मुंबईतील नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता महावितरणकडून संपूर्ण दक्षता घेण्यात येत आहे. पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वीज सेवा कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.”- बेले रामलिंग गोरखनाथ, कार्यकारी अभियंता, वाशी मंडळ कार्यालय