नवी मुंबई : पनवेल नजीक असलेल्या कळंबोली  मार्बल मार्केटमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय कामगाराचा फरशी पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे काम करताना कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, सुरक्षा साधने आणि सोयी उपलब्ध करून द्याव्यात म्हणून कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२ तारखेला संध्याकाळी सातच्या सुमारास कळंबोली येथील मार्बल मार्केटमध्ये काम करीत असताना परशुराम पासवान या कामगाराच्या डोक्यावर फरशी पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असताना आज (शुक्रवारी) सकाळी त्याचा मृत्यू झाला. ही घटना कळताच कळंबोली  मार्बल मार्केटमधील कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले. येथे या कामगारांना कोणत्याही सेवा सुविधा उपलब्ध नाहीत, तसेच काम करीत असताना सुरक्षा साधनेही पुरवले जात नाहीत. या शिवाय सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कामगारांना माथाडी कामगार कायद्याप्रमाणे वागणूक मिळत नाही. अशा अनेक मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. मात्र पासवान यांच्या मृत्यूने कामगारांच्या सहन शक्तीचा उद्रेक झाला व काम बंद आंदोलन पुकारले गेले. 

हेही वाचा – नवी मुंबई : भाज्यांची दरवाढ; फरसबी, अद्रक, कोथिंबीर महागली

ही माहिती मिळताच आखिल महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष गणेश शिंदे हे मार्बल मार्केटमध्ये दाखल झाले. त्यांनीही काम बंद आंदोलनाचे समर्थन केले. तसेच मृत कामगार परशुराम पासवान याच्या घरात त्याच्या व्यतिरिक्त कोणीही कमावती व्यक्ती नसल्याने परशुराम पासवान याच्या कुटुंबीयांना ५० लाखांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. परशुराम पासवान याच्या डोक्यात फरशी पडल्यानंतर त्याला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आज सकाळी त्याचा मृत्यू झाला, यामुळे सर्व कामगारांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे व काम बंद आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद असणार आहे, असेही शिंदे यांनी सांगितले. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A laborer working in kalamboli marble market died after the tile fell down the workers went on strike ssb