नवी मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हातात आता स्मार्ट वॉच दिसू लागले असून त्यानुसार प्रशासनाने ‘स्मार्ट’ कारवाईसही सुरुवात केली आहे. सुरुवातीला सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन सुरू केले असून बेलापूर विभागातील ४५० सफाई कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा दिसून आला आहे. यामुळे ‘जेवढा वेळ काम, तेवढेच वेतन’ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एका कंत्राटदाराच्या पर्यवेक्षकाला कामावरून कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालिकेने विविध खात्यातील कंत्राटी कामगारांच्या कामावर नियंत्रण ठेवणारे बायोमॅट्रिक वॉच देण्यात आले असून कर्मचाऱ्यांचा वेळकाढूपणा, कामचुकारपणा समोर येत आहे. त्यामुळे पुढील काळात आणखी करडी नजर ठेवण्याचेही प्रशासनाने ठरविले आहे.

प्रथमत: घनकचरा व्यवस्थापन तसेच आरोग्य विभागात ही प्रणाली राबविण्यास सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने सर्वच महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या हातात हे स्मार्ट वॉच असणार आहे. यामुळे त्यांच्या कामाच्या ठिकाणासह हालचालींची माहिती मुख्यालयातील नियंत्रण कक्षाला मिळत आहे.

सध्या पालिका प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांवर या ‘वॉच’ ठेवला असून संकलित माहितीवर कारवाईचा बडगाही उगारला आहे.

सर्व विभागातील एकूण २९०० कंत्राटी सफाई कर्मचारी यांना हे स्मार्ट वॉच देण्यात आले आहेत. बेलापूर विभागातील सफाई कर्मचाऱ्यांपासून कारवाई सुरू केली आहे. यात ४५० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना स्मार्ट वॉचच्या माहितीनुसार त्यांनी केलेल्या कामाच्या वेळेइतकाच मोबदला देण्यात येणार आहे.

सध्या बेलापूर भागातील सफाई कर्मचारी यांच्यावर कारवाई सुरू झाली असून टप्प्याटप्प्याने इतर विभागात करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर असलेल्या हजर नोंदींनुसार पगार देण्यात येत आहेत. पुढील आठवडय़ापासून अधिक करडी नजर राहणार आहे,असे पालिकेचे घनकचरा व्यवस्थापनचे उपायुक्त तुषार पवार यांनी सांगितले.

कायम नजर ठेवणार

पुढील कालावधीत ‘स्मार्ट वॉच’च्या माध्यमातून अधिक करडी नजर ठेवण्यात येणार आहे. कामाच्या आठ तासांच्या कालावधीत कर्मचाऱ्यांनी कामाव्यतिरिक्त जागा बदलल्यास पालिका मुख्यालयातून त्यांना त्वरित संपर्क साधून ज्या ठिकाणी उपस्थित असतील त्याचे लोकेशन तसेच फोटो पाठविण्यास सांग्तिाले जाणार आहे. दुसऱ्या ठिकाणी कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

पर्यवेक्षकावर कारवाई

बेलापूर विभागातील गट क्र१७ मधील मे. राज कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराच्या ४ सफाई कामगारांनी आपली बायोमॅट्रिक घडय़ाळे एकाच ठिकाणी ठेवली होती. ही बाब लक्षात येताच या गटाच्या निरीक्षणाची जबाबदारी असणाऱ्या पर्यवेक्षकाला कामावरून कमी करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले  आहेत, तसेच त्यांच्याकडून दंडात्मक रक्कमही वसूल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on clean sweep workers by smart watch