|| शेखर हंप्रस

सिडकोकडून भूखंड घेऊनही एसटी स्थानक उभारण्याकडे दुर्लक्ष

नवी मुंबई : नवी मुंबईतून रस्ते मार्गाने महाराष्ट्रात कुठेही प्रवास करायचा म्हणजे एक दिव्यच झाले आहे. दिवसभर महामार्गांवर प्रवाशांचे लोंढे वाहनांच्या प्रतिक्षेत उभे असल्याचे दिसते. महामार्गावरील एसटी महामंडाळाच्या थांब्यांचा ताबा हा खासगी वाहनांनी घेतलेला असल्याने मिळेल त्या वाहनाने प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. एसटी महामंडाळेने सिडकोकडून मोक्याचे अनेक भूखंड घेतले आहेत, मात्र वर्षानुवर्षे ते वापराविना पडून आहेत.

शीव-पनवेल महामार्गावर वाशी, सानपाडा, नेरुळ एलपी, बेलापूर, खारघर, कळंबोली व कामोठे आदी ठिकाणी तर ठाणे-बेलापूर महामार्गांवर कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आदी ठिकाणी प्रवाशांचे लोंढे उभे दिसतात. सकाळी व रात्री तर प्रवाशांची मोठी गर्दी या ठिकाणी असते. कुटुंबीयांसह रस्त्यावरच बसून वाहनांची प्रतिक्षा सुरू असते. कारण हक्काची एसटी नेमकी कधी येणार व कुठे थांबणार हे प्रवाशांना माहीतच नाही. महामार्गावर काही मोजक्या ठिकाणी एसटीचे थांबे आहेत मात्र त्यांचा ताबाही खासगी वाहनांनी घेतलेला असतो.

मराठवाडा, पश्चिाम महाराष्ट्र आणि कोकणात जाणारे प्रवाशी महामार्गावर एसटीची वाट पाहात उभे असतात. मुंबईतून सुटणारी एसटी एका तासानंतर नवी मुंबईत पोहोचेल अशी अपेक्षा असते. त्यानुसार प्रवासी रस्त्यावरच वाट पाहात असतात. मग आलेली एसटी आपलीच समजून साहित्यासह पळापळ होते. असे अनेकदा घडते. आरक्षण असल्याने तासन्तास प्रतिक्षा करावी लागते.

नवी मुंबईसारख्या नियोजित शहरात प्रवाशांची ही परवड सुरू आहे. विशेष म्हणजे सिडकोकडून ऐरोली आणि वाशी येथे एसटी महामंडळाने मोक्याचे भूखंड पदरात पाडून घेतले आहेत. मात्र या ठिकाणी बसस्थानक उभारण्याचा विसर एसटी महामंडळाला पडला आहे. त्यामुळे प्रवाशांची ही परवड सुरू आहे.

वाहतूक पोलिसांकडूनही दुर्लक्ष

वाशी, नेरुळ, सीबीडी या ठिकाणी एसटी महामंडाळाची टपरीवजा कार्यालये आहेत. ती रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत सुरू असतात. त्यानंतर ती बंद होतात. त्यामळे नेमक्या गर्दीच्या वेळी बस थांब्यांवर खासगी बससह इतर वाहनांना मोकळे रान मिळते. मग प्रवाशी आपल्याला मिळावेत म्हणून चढाओढ सुरू होते. या ठिकाणी अधूनमधून वाहतूक पोलिसांचे दर्शन होते, मात्र ते कारवाईसाठी येतात की आणखी कशासाठी, हा प्रश्न आहे. कारण खासगी वाहने पोलीस आल्यानंतरही तेथेच असतात. काही वेळ थांबून हे पोलीसही निघून जातात ते परत फिरकतही नाहीत.

तुर्भेतील भूखंडावर भंगार वाहने?

तुर्भे स्मशानभूमीसमोर एसटी महामंडळाचा आणखी एक भूखंड आहे. सात-आठ वर्षांपूर्वी या ठिकाणी मराठवाडा भागात जाणाऱ्या एसटी बस थांबत असत, मात्र येथे गैरसायी व स्मशानशांतता असल्याने प्रवासी थांंबत नसत. त्यानंतर हा थांबा वाशीतील एनएमएमटी बस डेपोत देण्यात आला. आता तेथील थांबाही या बसस्थानकाचे काम सुरू असल्याने वाशी महामार्गावर करण्यात आला आहे. तुर्भे येथील हा  भूखंड उप प्रादेशिक परिवहन उपक्रमाने भाडेतत्वावर घेतला असून जप्त केलेली बेवारस वाहने या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.

खासगी बस वाहतूकदारांचीही जागेची मागणी

महामार्गावर अनेक ठिकाणी एसटी बस थांब्यांच्या मागे पुढे व प्रसंगी बस थांब्यांवर खासगी बसच्या रांगा लागलेल्या असतात. आम्हीही अधिकृत प्रवासी वाहतूक करीत असतो. हक्काची जागा नसल्याने जिथे प्रवासी थांबतात तिथे बस उभ्या कराव्या लागतात. ट्रक टर्मिनलप्रमाणे आम्हाला जागा दिली कुणाचीच गैरसाोय होणार नाही, असे खासगी बस वाहतूकदार अरविंद जाधव यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांची तर मोठी गैरसोय होत असतो. तासन्तास रस्त्यावर बसून बसची वाट पाहावी लागते. हक्काची व सर्व सोयी सुविधायुक्त एसटी थांबा असेल तर ही गैरसोय दूर होईल.  – मंदाकिनी गारवे, प्रवासी

नवी मुंबईत एसटीला भूखंड देण्यात आले आहेत, मात्र बसस्थानक बनवण्याचे सध्या तरी नियोजन नाही. आगामी काळात काय नियोजन असेल हे आत्ता सांगू शकणार नाही. – अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, राज्य परिवहन उपक्रम