नवी मुंबई :कोकणातील हापूस आंब्याची आवक मेच्या दुसऱ्या आठवडय़ात मोठय़ा प्रमाणात वाढली असून सरासरी चाळीस हजार पेटय़ा हापूस आंब्याच्या बाजारात येत आहेत. परंतु हापूस आंब्याचा हंगाम आता मे च्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत राहण्याची शक्यता आहे. यानंतर गुजरातच्या हापूस आंब्याची आवक सुरू होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुर्भे येथील फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी करोनाच्या भीतीपोटी हापूस आंब्याची मागणी कपात केली आहे. तरीही घाऊक बाजारात कोकणातील हापूस आंब्याच्या हजारो पेटय़ा येत आहेत. मंगळवारी बाजारात आलेल्या फळांच्या ४४४ वाहनांमध्ये हापूस आंब्याच्या निम्म्या  गाडय़ा होत्या. बागायतदारांनी कृषी विभागाच्या साहाय्याने मुंबई पुण्यात थेट विक्री करण्याचा प्रयत्न केला आहे.  हे दोन्ही क्षेत्र करोनाच्या लाल क्षेत्रात आल्याने विक्री कमी झाली आहे. एपीएमसीच्या पाचही बाजारात करोनाची लागण झालेले व्यापारी आढळून येऊ लागल्याने बहुतांशी व्यापाऱ्यांनी कमी मागणी नोंदवण्यास सुरुवात केली आहे. यंदा कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम दोन महिने उशिराने सुरु झालेला आहे. गुढीपाडव्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर झाल्याने हापूस आंब्याच्या विक्रीवर संकट ओढवले आहे. आता १५ ते २० मे पर्यंत कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर गुजरात व कर्नाटकमधील हापूस आंब्याची आवक सुरू होणार आहे. हापूस आंब्याची आवक वाढल्याने भावही कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाचा हापूस आंबा आता खाणे शक्य आहे. यानंतर इतर राज्यातील हापूस आंब्याची आवक सुरू होईल पण त्याला कोकणातील हापूस आंब्याची सर नाही. त्यामुळे ग्राहकांनी या महिना अखेपर्यंत हापूस आंब्याचा आनंद घ्यावा, असे फळ बाजार संचालक संजय पानसरे व व्यापारी विजय भेंडे यांनी स्पष्ट केले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrival of alphonso mangoes increased in 2 week of may zws