नेरुळ गाव
पंधरा एकरची टेकडी, टेकडीच्या चारही बाजूने भातशेती, मिठागरे आणि खाडी, टेकडीवर गोडय़ा पाण्याच्या चार विहिरी, आठ देवळे, देवळातील दिवाबत्तीची गावकऱ्यांनी वाटून घेतलेली जबाबदारी, मुबलक निर्सगसंपदा, दुधदुभत्यासाठी गायी गुरे, कष्टकरी स्त्री-पुरुष, दिवसभर काम आणि रात्री देवाचे नाम, तमाशापासून संगीतनाटय़ापर्यंत कला जोपासणारे कलाकार, तेवढीच शिक्षणाचीही आवड. त्यामुळे मास्तरांचे गाव अशीही ओळख. पंचक्रोशीत पाण्याचे पहिले स्टॅन्डपोस्ट लावणाऱ्या या गावाचे नाव आहे नेरुळ. टेकडीवरच्या या गावात शहरीकरणाच्या स्पर्धेत प्रति बालाजीपासून माता अमृतानंदमयीचे मठ तयार झाले. नवी मुंबईचा मणिहार ओळखल्या जाणाऱ्या पामबीचला खेटून असणाऱ्या या गावातील न्हावेखार खाडीच्या पाण्यातच पालिका शहरातील पहिले पर्यटन स्थळ (वॉटर बोट) विकसित करणार आहे.
गावाचा इतिहास तसा जुना. चारशे-साडेचारशे वर्षांपूर्वीचा. कोणी म्हणतं शहाबाजला झालेल्या मराठे-पोर्तुगीज लढाईत हे गाव होते पण तशी नोंद नाही. गावात भगत, म्हात्रे, पाटील, घरत, भोपी, मढवी, भोईर अशा वीस-पंचवीस आगरी कोळ्यांच्या कुटुंब विस्तारातून ह्य़ा गावाची सद्य:स्थितीची लोकसंख्या पाच हजाराच्या वर गेली आहे. पन्नास-साठ वर्षांपूर्वी हा आकडा शेकडय़ामध्ये होता. स्वयंपूर्ण, स्वाभिमानी, संवेदनशील अशा या नेरुळ गावात ठाणे बेलापूर पट्टीतील सर्वाधिक जास्त कलाकारांची निर्मिती झाली आहे.
तमाशाचे फड, संगीतनाटय़, बाल्यानृत्याबरोबरच भजनाची अविरत परंपरा या गावाने जपली आहे. कालानुरूप इतर कला गावातून हद्दपार झाल्या असल्या तरी भजनाचा वसा सहाव्या तरुण पिढीने कायम ठेवला आहे. हंसारामबुवा नेरुळकर यांनी ही भजन चळवळ गावात रुजवली. हंसारामबुवांच्या भजनांची गोडी अवीट आहे. त्याकाळी म्हणजे तब्बल पन्नास वर्षांपूर्वी हंसारामबुवांनी रेडिओवर भजने गायली होती. ती ऐकण्यासाठी अख्खं गाव दिवाळ्याला गेले होते. कारण गावात रेडिओ नावाचा प्रकारच नव्हता. श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळे गावातील ग्रामपंचायतीमध्ये हा रेडिओ संध्याकाळी लाऊड स्पीकरवर लागायचा.
गावाच्या सुपुत्राचा आवाज प्रत्यक्ष कानाने ऐकता यावा म्हणून गाव दिवाळ्याला गेले. भजन संपले तरी ग्रामस्थ रोडिओसमोरून हटायला तयार नव्हते. पुन्हा लागेल या भावनेतून. इतका अभिमान ग्रामस्थांना होता. तीच भजन चळवळ आजही जपली गेली आहे. गावात शिक्षकांचीही परंपरा कायम आहे. आतापर्यंत ४२ शिक्षकांनी विद्यादानाचे काम केले आहे. आजही २० तरुण शिक्षकी पेशा सांभाळून आहेत. आत्ताच्या नेरुळ टेकडीपासून सुरू होणारे हे गाव तिकडे पामबीचपर्यंत पसरले होते. नेरुळ रेल्वे स्थानकात या गावाची एक विहीर होती. धुमकुली, शिंप्री अशी या टेकडीच्या काही भागांना नावे दिली गेली होती. सुरक्षित आणि सुंदर असणाऱ्या या गावाचे वर्णन तसे श्रीकृष्णाच्या गोकुळाशी करता येण्यासारखे आहे. गावात मरीआई, भैरीदेव, श्री शंकर, श्री मारुती व झोटिंगदेवाचे देऊळ ही मंदिरे आहेत. नेरुळ सेक्टर १८ मध्ये सध्या असलेले श्री शंकर मंदिर हा या गावाचाच भाग. लवकर पाऊस पडला नाही की याच शंकराला दूध व पाण्याचा अभिषेक घालण्याची परंपरा होती. भजन संगीताच्या तालावर ‘देव बुडवण्याचा’ कार्यक्रम होत होता. शंकराच्या या मंदिरात सापांचाही तेवढाच वावर होता. त्यामुळे एकटा दुकटा गावकरी या मंदिरात जाण्यास थोडासा कचरायचाच. गावातील मंदिरातील देवांसमोर दररोज दिवाबत्ती झाली पाहिजे असा एक दंडक होता. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. करावे गावातून रात्री-अपरात्री पायी येणाऱ्या ग्रामस्थांना झोटिंगदेव सोबत करायचा अशी एक आख्यायिकादेखील आहे. भिऊ नकोस मी तुझ्या सोबत आहे. असा आधार कोणीतरी देत असल्याची भावना ग्रामस्थांची होती. धार्मिक रूढी पंरपरा जपणाऱ्या या गावातील जत्रेत निघणाऱ्या ३० ते ४० फूट उंच मानाच्या काठीवर वाघाचा भगत म्हणून ओळखले जाणारे शंकर म्हात्रे सहज चढत होते. ठाणे बेलापूर पट्टीत त्यावेळी हे एक आश्चर्य मानले जात असे. श्रावण महिन्यात अनंत शंकर म्हात्रे यांच्या घरी होणारे महाभारत, रामायण, पांडवप्रताप, शिवलीला सारख्या ग्रंथांच्या पारायणाला गावातील मंडळींची आर्वजून हजेरी होत असे. त्याच संस्कारातून आजची पिढी घडत गेली. कोल्हापूरहून येणाऱ्या मास्टर नरेश यांचे नाटय़दिग्दर्शन तर संपूर्ण पट्टीत होत होते. यात आणखी एका नावाची भर पडते. ती भाई कुलकर्णी यांची. नाटय़वेडय़ा भाईंनी गावात अनेक नाटके बसविण्यास मदत केली. देशाच्या प्रति संवेदनशील असणाऱ्या या गावाने महात्मा गांधी यांच्या निधनानंतर त्यांचे विधिवत श्राद्ध घातले. त्यासाठी घरटी शिधा जमा करण्यात आला. गावातील २०-२५ ग्रामस्थांनी त्यावेळी केशवपन केले. महात्मा गांधींच्या अचानक जाण्याने अनेक दिवस गावातील ग्रामस्थ शोकाकुल होते. गांधीहत्येचे पडसाद नंतर नाटक आणि संगीतातून उमटेल. हरिभाऊ गणपत पाटील यांनी १७ वर्षे गावाचे सरपंचपद भूषविले. हुशार माणूस. सामाजिक व राजकीय खडानखडा माहिती असलेल्या पाटील यांनी गावात नळाचे स्टॅन्डपोस्ट प्रत्येक आळीत लावून घेतले. वीज आणण्यासाठी प्रयत्न केले. मोटारसायकल, शिकारीची बंदूक आणि बोलण्यात करारीपणा यामुळे त्यांचा एक दरारा गावात होता. इंग्रज पोलीसदेखील गावात पाय ठेवताना दहा वेळा विचार करीत होते. गावात येण्यापूर्वी हरिभाऊंची संमती घेतली जात होती. असाच काहीसा भीतियुक्त दरारा हिराजी गणू पाटील यांचाही होता. पेशाने शिक्षक असलेले हिराजी रस्त्याने चालले की गावातील मूलही रस्ता बदलायचे.
गावातील गणपतशेठ पाटील आणि कराव्याचे गणपतशेठ तांडेल यांचे या भागात एक वजन होते. त्यावेळी ठाणे ते बेलापूर दरम्यान सोनटक्के ट्रॅव्हल्सची एक खासगी गाडी चालायची. त्यात या दोन गणपतरावांच्या जागा निश्चित होत्या. त्यावर बसण्याची हिमंत कोणी करीत नव्हता. शेठच्या जागा म्हणून त्याकडे पाहिले जात होते. सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक परंपरा राखणाऱ्या या गावाचे नेरुळ हे नामकरण का झाले याचे कोडे मात्र अद्याप उलगडलेले नाही.