अनेक महिने ५४५ अर्ज प्रलंबित
नवी मुंबई : लोकसेवा हक्क २०१५ नुसार जन्म आणि मृत्यूचे तीन दिवसांत दाखले देणे बंधनकारक असताना नवी मुंबईत नागरिकांना दोन महिने ताटकळत राहावे लागत आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ऐरोली येथील तीन अधिकाऱ्यांवर कारवाई केली असली तरी आठ प्रभागांत असे ५४५ अर्ज गेले अनेक महिने आवश्यक असलेले हे दाखले मिळविण्यासाठी प्रलंबित आहेत. पालिका ई गव्हर्नन्ससारख्या विभागावर लाखो रुपये खर्च करीत असून नागरिकांची या दाखल्यासाठी आजही परवड सुरू आहे.
जन्म, मृत्यू आणि विवाह झालेल्या नागरिकांना अनेक कारणांसाठी या दाखल्यांची आवश्यकता भासत असल्याने ते स्थानिक पालिका प्रभाग कार्यालयात अर्ज करीत असतात. ऐरोली येथील एका नागरिकाने आपल्या अपत्याची नोंद १५ऑक्टोबर रोजी ऐरोली प्रभाग कार्यालयात जाऊन केली होती. स्थानिक रुग्णालयाकडूनही या अपत्य जन्माची माहिती पालिकेला प्राप्त झाली होती. १५ ऑक्टोबरला प्रभाग कार्यालयात जाऊन नोंद केल्याने तीन दिवसांत हा जन्मदाखला मिळणे अपेक्षित होते. लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार जन्म आणि मृत्यू यांचे दाखले तीन दिवसांत नागरिकांना देणे बंधनकारक आहे, मात्र हा दाखला डिसेंबर महिना उजाडला तरी न मिळाल्याने त्यांनी थेट आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे तक्रार केली. प्रभाग कार्यालयात अनेक वेळा जाऊन चौकशी केल्यानंतर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे या नागरिकाने या कार्यालयातील रिकाम्या खुर्चीचे फोटो आयुक्तांना पाठविले. आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी ऐरोली प्रभाग कार्यालयाला अचानक भेट दिली. दोन महिने साधा दाखला न देणाऱ्यामहिला लिपिकासमोर आयुक्त उभे राहिल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली असली तरी हा दाखला देणारी लिपिक आयुक्तांना आपल्या परीने समजवताना आपले कसे बरोबर आहे हे पटवून देत होती. चार कर्मचाऱ्यांचे काम या महिलेला करावे लागत असल्याने कामाचा ताण होता, हे मान्य केल्यानंतरही दोन महिन्यांचा कालावधी हा जास्तच असल्याचे स्पष्ट झाले. दाखला देण्यास कसा उशीर झाला त्याचे सर्मथन करणारी ही महिला अधिकारी दाखला मागणाऱ्यानागरिकांना कसे हेलपाटे मारण्यास भाग पाडते याच्या अनेक कथा ऐरोली प्रभागात सांगितल्या जात आहेत.
मृत्युदाखलेदेखील प्रलंबित आहेत. करोनाकाळात नवी मुंबईत अनेक रुग्णांचा मृत्यू झाला असून हे दाखलेदेखील त्यांच्या कुटुंबीयांच्या हातात पडलेले नाहीत. त्यामुळे त्या करोनाग्रस्त मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पॉलिसी तसेच नोकरीसंर्दभात हा मृत्युदाखला देण्यात अडचणी येत आहेत.
विवाह दाखल्यांसाठीही अडचणी
जन्म, मृत्युदाखल्यानंतर विवाह दाखल्याची आवश्यकता भासत आहे. अनेक तरुण नोकरीधंद्यानिमित्ताने परदेशी जात असून काही दिवसांनी आपल्या नववधूला परदेशात बोलवून घेत आहेत. त्यामुळे त्यांना विवाह दाखल्याची जास्त गरज भासत आहे. दोन महिने जन्म दाखल्यासाठी संघर्ष करणाऱ्याऐरोलीतील नागरिकाला दोन ऑक्टोबरपूर्वी विवाह दाखल्यासाठी झगडावे लागले होते. या दाखल्यावरच पासपोर्ट व व्हिसासारखी महत्त्वपूर्ण कामे होत असून राज्य सरकारने सध्या मालमत्ता हस्तांतरण करताना बक्षीसपात्र योजना जाहीर केली आहे. त्यासाठी या विवाह प्रमाणपत्राची आवश्यकता भासत आहे. जेमेतेम वीस लाख लोकसंख्या असलेल्या शहरात जन्म-मृत्यू- विवाहसारखे दाखलेदेखील मिळणे मुश्कील झाल्याने आश्र्यय व्यक्त केले जात आहे.