ऐरोलीतील बर्न हॉस्पीटल परिसरात फुलपाखरू उद्यानाची निर्मिती

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुग्ण, मग तो कोणताही असो, तन आणि मनाने दुखावलेला, त्यात भाजलेल्या रुग्णांच्या शरीराची दाहकता जीव नकोसा करणारी. ऐरोली सेक्टर १३ येथील आशिया खंडातील सर्वात मोठय़ा नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये अशा शेकडो रुग्णांवर दररोज उपचार केले जात आहेत. त्यांच्या मनाला उभारी मिळावी, जगण्याचा एक मंत्र शिकता यावा म्हणून या हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक आणि सुप्रसिद्ध प्लास्टिक अ‍ॅन्ड कॉस्मेटिक सर्जन डॉ. सुनील केसवाणी यांच्या संकल्पनेतून एका फुलपाखरू उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. जगातील फुलपाखरांचे अभ्यासक दिवाकर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या फुलपाखरू उद्यानाचा लोर्कापण सोहळा रविवारी सकाळी होणार आहे. उद्यानात आतापर्यंत ५५ प्रकारच्या फुलपाखरांनी आपली चंचलता दाखवली आहे.

मुलुंड-ऐरोली खाडी पुलाच्या उत्तर बाजूस सुमारे सोळा एकर जागेवर आशिया खंडातील सर्वात मोठे बर्न हॉस्पिटल वीस वर्षांपूर्वी सुरू झालेले आहे. या भागात कोणी जाण्यास तयार नव्हते. त्या वेळी या रुग्णालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. आगीत भाजलेल्या राज्यातील हजारो रुग्णांवर या रुग्णालयात आतापर्यंत उपचार झालेले आहेत. याच रुग्णालय आवाराच्या पूर्व बाजूस असलेल्या एक एकरच्या मोकळ्या जागेत हे फुलपाखरू उद्यान विकसित करण्यात आले आहे. त्यासाठी फुलपाखरांना आकर्षित करू शकतील अशी मधाळ घाणेरी, सदाफुली, जैमकन, स्पाइक्स आणि ऐक्झोरा यांसारख्या २५ वेगवेगळ्या शेकडो फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हे उद्यान विकसित करण्यास घेतले गेले. यंदा पडलेल्या चांगल्या पावसाने येथील फुलझाडांनी चांगलाच जोर धरला असून ऑगस्ट महिन्यात संपूर्ण बर्न हॉस्पिटल परिसर फुलपाखरूमय झाले होते. या रुग्णालयाच्या आजूबाजूचा परिसरही त्यासाठी    अनुकूल असून ठाणे खाडीकिनारा असलेल्या या परिसरात विविध जैवविविधता जोपासली गेली आहे. त्यामुळे आतापर्यंत विविध ५५ प्रकारच्या फुलपाखरांनी आपल्या अल्पजीवी जीवनातही स्वच्छंदी जगण्याचा मंत्र येथील रुग्णांना देण्यात येणार आहे. बटरप्लॉय ऑफ इंडियाचे आयझ्ॉक किहीमकर यांच्या उपस्थितीत आणि डॉ. उल्हास कोल्हाटकर यांच्या हस्ते  रविवारी सकाळी १० वाजता फुलपाखरूउद्यान लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. रुग्णालय इमारतीत ठोंबरे यांच्या जगातील दीड लाख फुलपाखरांच्या छायाचित्रांपैकी १०० छायाचित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन ठेवले जाणार असून ते सर्वासाठी खुले केले जाणार आहे.

रंगीबेरंगी दिसणारी फुलपाखरे मनाला आनंद देणारी वाटतात. असाहाय्य वेदनांनी येथील रुग्ण तळमळत असल्याचे मी गेली अनेक वर्षे पाहत आहे. त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देण्याचे काम ही फुलपाखरे करू शकतील याच विचाराने हे फुलपाखरु उद्यान विकसित करण्यात आले आहे.

– डॉ. सुनील केसवाणी, वैद्यकीय संचालक, नॅशनल बर्न सेंटर, ऐरोली.

अल्पजीव आयुष्यात स्वच्छंदी कसे जगावे हे केवळ फुलपाखरू शिकवू शकते. नॅशनल बर्न सेंटरचा संपूर्ण परिसर फुलपाखरांसाठी अनुकूल आहे. सेंटरच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने एप्रिलपासून या कामाला सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात हा परिसर फुलपाखरूमय झाला होता. केवळ एक एकरपुरते मर्यादित न ठेवता आणखी दोन-तीन एकरवर हे उद्यान वाढविण्यात येणार असून केवळ फुलपाखरांवर काम करणाऱ्यांना अभ्यासाची संधी दिली जाणार असून त्यांच्या संस्थेची स्थापना केली जाणार आहे. पेरू, घाणा या देशांनंतर आपल्या देशात खूप चांगल्या फुलपाखरांच्या प्रजाती पाहण्यास मिळत आहेत. याच फुलपाखरू उद्यानात यंदा मुलांसाठी फुलपाखरू महोत्सव आयोजित करण्याचा विचार आहे.

– दिवाकर ठोंबरे, फुलपाखरूप्रेमी व अभ्यासक, ठाणे 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Butterfly park in airoli