उन्हाळ्यात महाग असणाऱ्या फळभाज्या पावसाळा सुरू होताच स्वस्त होण्यास सुरुवात होत असते, परंतु पावसाळ्यात पालेभाज्यांचा भाव वधारल्याचे चित्र आहे. सध्या मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात पावसामुळे कोथिंबीरची आवक कमी झाली असून दर वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी घाऊक बाजारात २०-३० रुपयांवर असलेली कोथिंबीर जुडी आता ३५ ते ४५ रुपयांवर पोहोचली आहे.
एपीएमसी बाजारात सध्या पुणे व नाशिक या ठिकाणाहून कोथिंबीर दाखल होत आहे.
बाजारात बुधवारी १,५९,५०० जुडय़ा कोथिंबीरीची आवक झाली असून आवक घटल्याने तसेच भिजलेली, खराब कोथिंबीर येत असल्याने दरवाढ झाल्याचे मत व्यापऱ्यांनी व्यक्त केले आहे. सतत पडणाऱ्या पावसाने कोथिंबीरच्या उत्पादनात घट होत असून परिणामी आवक कमी होत आहे.
पावसाच्या संततधारेने पिकाला पाणी लागल्याने कोथिंबीर खराब होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच काढलेली कोथिंबीर पाण्यात भिजल्याने लवकर कुजत आहे. त्यामुळे बाजारात दाखल होणाऱ्या कोथिंबीरीत घट झाली आहे. गृहिणी प्रत्येक पदार्थात प्रामुख्याने कोथिंबीर वापरण्यास अधिक पसंती देत असतात. १,८९, ६०० जुडय़ा कोथिंबीर बाजारात दाखल होत होती.
दोन दिवसांपूर्वी घाऊक बाजारात २० ते ३० रुपयांना मिळणारी कोथिंबीर जुडीमध्ये नाशिकची कोथिंबीर बुधवार ४५ ते ५० रुपयांवर तर पुण्याची कोथिंबीर २०-३० रुपयांनी उपलब्ध आहे. तर किरकोळ बाजारात कोथिंबीरची १० रुपयांना मिळणारी छोटी जुडी आता ५० रुपयांना मिळत आहे.