किनाऱ्यावरील मासेमारीमुळे खवय्यांसाठी पर्वणी
जून व जुलै हे दोन महिने मासळीच्या प्रजननाचा कालावधी असल्याने खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाकडून बंदी घातली जाते. त्यामुळे बाजारांमधील मासळीची आवक घटली असून किनारपट्टीवरील रहिवाशांना सध्या महागडी मासळी घ्यावी लागत आहे. पण मान्सूनच्या आगमनामुळे या खवय्यांना आता दिलासा मिळणार असून समुद्र किनाऱ्यापासून १२ नॉटिकल मैलापर्यंत छोटय़ा मासेमारी बोटीतून मासेमारीला परवानगी असल्याने लवकरच ताजी मासळी बाजारात दाखल होणार आहे.
पावसाळ्यात खोल समुद्रात मासेमारी करणे धोकादायक असल्याने तसेच हा काळ मासळीच्या प्रजननाचा असल्याने राज्य तसेच केंद्र सरकारकडून पावसाळ्याच्या दोन महिन्यात मासेमारी बंद असते. असे असले तरी मासे हे आहारातील प्रमुख अन्न असलेल्या स्थानिकांना मात्र सुकविलेल्या मासळीवरच आपली हौस भागवावी लागते. परंतु खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदीच्या काळात किनाऱ्यावरील छोटय़ा बोटींची मासेमारी सुरू असल्याने या काळात बाजारात बोंबील, वाकटय़ा, मांदेली, खेंगड, शिंगाली आदी ताज्या मासळीची आवक होते. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या या मासळीची आवक येत्या पंधरा दिवसात सुरू होईल, अशी माहिती करंजा येथील मच्छीमार विनायक पाटील यांनी दिली.
मासेमारी बंदीच्या काळात कोणत्याही यांत्रिकी मासेमारी बोटीला मासेमारी करता येत नाही. मात्र बिगर यांत्रिकी बोटीद्वारे मासेमारी करण्याची बंदी नसल्याने या बोटी किनाऱ्यावर मासेमारी करू शकतात.
–अविनाश नाखवा, सहाय्यक आयुक्त, मत्स्य विभाग, रायगड.
