नवी मुंबई : ठार मारण्याची धमकी दिल्याच्या एक महिलेच्या तक्रारीवरून ऐरोली विधानसभा भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत काही दिवसापूर्वी या महिलेने निवेदन दिले होते. मात्र त्याची दखल नेरुळ पोलिसांनी घेतली नसल्याचा आरोप करत या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. राज्य महिला आयोगाने नवी मुंबई पोलिसांना निर्देश दिल्यावर सदर गुन्हा सीबीडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेरुळ येथे राहणाऱ्या एका महिनेने गेल्या काही दिवसांपुर्वी नाईक यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यात नाईक हे माझ्याबरोबर गेल्या २७ वर्षांपासून लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहत असून त्यांच्यापासून मला एक मुलगाही झाला आहे. याच मुलास वडील म्हणून नाईक यांचे नाव मिळावे यासाठी या महिलेने नाईक यांच्याकडे मागणी केली होती, असा दावा पीडित महिलेने तक्रारीत केला होता. गणेश नाईक यांनी मार्च २०२१ मध्ये तिला बेलापूर येथील सेक्टर १५ मधील आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. तिथेही या महिलेने हीच मागणी पुन्हा केली यावेळी मात्र नाईक यांनी या महिलेवर परवाना असलेले  रिव्हॉल्व्हर ‘रोखून तू जास्त बोलू नको. तू काय करणार? तुम्ही मला त्रास देऊ नका नाही तर मी स्वत:ला पण संपवेल आणि तुम्हाला सुद्धा संपवेल’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारदार महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime bjp mla ganesh naik woman accused threatening kill ysh