उरण तालुक्यातील पोलीस, शासकीय कर्मचारी आणि महावितरण या तिन्ही विभागांच्या कामगार वसाहतींची दुरवस्था झाली असून सध्या गर्दुल्ल्यांनी त्यांचा ताबा घेतला आहे. या वसाहतींमध्ये अनैतिक कामांसाठी वापर केला जात आहे. एकीकडे वसाहतीत जागा उपलब्ध नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना दोन तासांचा प्रवास करून नोकरीच्या ठिकाणी जावे लागत आहे, तर नादुरुस्तीच्या नावाखाली बंद वसाहतीतील सामानही चोरीस गेले आहे. यातील अनेक वसाहतींचा पार्किंग म्हणून वापर केला जात आहे. या संदर्भात संबधित विभागांकडे चौकशी केली असता दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार सुरू असल्याची उत्तरे दिली जात आहेत.
शासनाच्या विविध विभागांच्या कामगार वसाहती उरण तालुक्यात आहेत. यामध्ये महावितरण कंपनीची पूर्ण वसाहत शहरालगतच आहे. या वसाहतीची दुरवस्था झाली आहे. वसाहतीशेजारी मटण व्यवसाय करणारे या वसाहतीत आपल्या बकऱ्या बांधीत असून वसाहतीला गोठय़ाचे स्वरूप आले आहे.तसेच अनेकांकडून या वसाहतींचा गोदाम म्हणून वापर केला जात आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना खाजगी रूम घेऊन भाडय़ाने रहावे लागत आहे. या संदर्भात महावितरण कंपनीचे अतिरिक्त अभियंता प्रवीण साळी यांच्याशी संपर्क साधला असता चार महिन्यांपूर्वीच महावितरणच्या बांधकाम विभागाकडे वसाहतीच्या दुरुस्तीची मागणी करणारे पत्र पाठविल्याची माहिती दिली. यामध्ये वसाहतीचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी कुंपण घालण्याचीही मागणी करण्यात आली असल्याचे त्यांना सांगितले.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महसूल विभागाच्या जागेत एक वसाहत आहे. या वसाहतीचा ताबा मानसिक संतुलन बिघडलेल्यांना तसेच गर्दुल्यांनी घेतला आहे. अनेकदा तरुण या वसाहतीत गैरकृत्य करतानाही आढळत आहेत. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. या वसाहतींच्या देखरेखीची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उरणचे नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांना विचारला असता आमच्या विभागाची एकच खोली असून उर्वरित खोल्या कोणाच्या ताब्यात आहेत ते माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे शेजारी राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे नागाव रोड परिसरात शहराला लागूनच पोलीस वसाहत आहे. या वसाहतीचीही दुरवस्था झाली आहे. इमारतींचे दरवाजे, खिडकी उखडून पडल्या आहेत. या वसाहतीवर पिंपळाची झाडे उगवू लागली आहेत. त्यामुळे इमारत कोसळण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.
नादुरुस्त इमारत दुरुस्त करण्यासाठी आता पोलीस विभागाकडेच जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी या विभागाकडे मागणी करण्यात आल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी दिली.
