आवक घटण्याच्या शक्यतेने किरकोळ बाजारात महागाई
शेतकऱ्यांनी गुरुवार, १ जूनपासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचे परिणाम वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एक दिवस आधीच दिसून येऊ लागले आहेत. शेतकऱ्यांचा संप सुरू झाला तरी, सुरुवातीचे दोन दिवस आवक फारशी कमी होणार नाही, असा अंदाज एकीकडे व्यक्त होत असतानाच, किरकोळ बाजारात मात्र बुधवारपासूनच भाज्यांचे दर सरासरी १० ते २० रुपये प्रति किलोंनी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपाचा विक्रेत्यांकडून गैरफायदा घेतला जाण्याची व त्यात ग्राहक भरडला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यातील शेतकरी पहिल्यांदाच संपावर जाणार आहेत. त्यामुळे या घटनेबाबत सर्वत्र उत्सुकता आणि धास्ती आहे. संपकाळात भाज्या व फळांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या गाडय़ा आधीच बाजारांकडे रवाना झाल्या आहेत. त्यामुळे संपाच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत हा तुटवडा जाणवणार नाही, अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. या संपाचे परिणाम काय होतील, याबाबत अद्याप चर्चा सुरू असली तरी, संपाच्या पूर्वसंध्येलाच किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर वाढवून विक्रेत्यांनी आपली पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न केला. किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरांत १० ते २० रुपयांची वाढ झाल्याचे बुधवारी दिसून आले. अनेक ठिकाणी ‘आठवडाभराची भाजी आजच घेऊन जा, उद्या मिळणार नाहीत’ असेही विक्रेते ग्राहकांना बजावत असल्याचेही दिसून आले.
शेतकऱ्यांच्या संपाने भाज्यांचे दर कडाडण्याची चिन्हे आहेत. तसेच पुढचे काही दिवस भाज्यांचा पुरवठा कमी प्रमाणात होणार असून साहजिक मागणी जास्त असल्याने दरही वाढतील. त्यामुळे काही ग्राहक आठवडाभराची भाजी घेण्याचे पसंत करीत आहेत.
– संभाजी चौघुले, किरकोळ भाजी विक्रेता
