नवी मुंबई : मुंबई कृषि उत्पन्न कांदा बटाटा बाजारात दाखल झालेला बटाटा सडत असून तो कचऱ्यात फेकण्याची नामुष्की ओढवली आहे. एपीएमसीत उत्तर प्रदेशमधून बटाटा दाखल होता असून वजन काटा बंद असल्याने बाजारात वेळेवर गाडी विक्रीसाठी दाखल होत नाही, त्यामुळे बटाटा आणखीन खराब होत असून सडत आहे. सोमवारपासून तब्बल ३०० टनाहून अधिक बटाटा सडला असून तो कचराभूमीवर फेकण्याची वेळ एपीएमसी ओढवली आहे. एपीएमसीत दररोज बटाट्याच्या ३० ते ४० गाड्या दाखल होत आहेत. परराज्यातील उत्तर प्रदेशातून बटाटा दाखल होत आहे. परंतु पावसामुळे जागेवरून ओला बटाटा भरला जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणाहून बाजारात बटाटा येण्यासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी जात आहे. पुन्हा एपीएमसी बाजारातील १५-२०दिवसांपासून वजन काटाबंद असल्याने बाहेर वजन करून बाजारात गाडी विक्रीसाठी दाखल होण्यासाठी उशीर होत आहे. परिणामी बटाट्याच्या विक्रीला विलंब होत असल्याने बटाटा मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे. तर सोमवारपासून ही परिस्थिती अधिक बिकट होत असून बुधवारी बाजारात मोठया प्रमाणात बटाटा सडला होता. हा सडलेला बटाटा बाजारात सडत पडत नसल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे हा सडलेला ३०० टन ते ३५० टन बटाटा तुर्भे येथील कचराभूमीवर फेकण्यात आला आहे. हेही वाचा : पनवेल: पंधरा दिवसांपूर्वी सुरक्षित असलेला फलक पडलाच कसा सर्वोत्तम दर्जाच्या बटाट्याची दरवाढ एपीएमसी बाजारात उत्तर प्रदेशमधून बटाटा दाखल होत असून त्या ठिकाणाहून ओला बटाटा गाडीमध्ये भरला जात आहे. तेथून एपीएमसी बटाटा दाखल होण्यासाठी २ते ३ दिवस जात आहेत. तर दुसरीकडे एपीएमसीचा वजन काटा बंद असल्याने त्याच्या अभावी विक्रीसाठी बटाटा दाखल होण्यास उशीर होत आहे. या दोन्ही कारणांमुळे सध्या मोठ्या प्रमाणावर बटाटा सडत असून तो कचऱ्यात फेकावा लागत आहे. त्यामुळे बाजारात अवघा २० ते ३० टक्के उत्तम दर्जाचा बटाटा उपलब्ध आहे. परिणामी बाजारात चांगल्या बटाट्याला जास्त मागणी असल्याने दर वधारले आहेत. आधी प्रतिकिलो २२ते २५रुपयांनी उपलब्ध असलेला बटाटा आता २६ ते ३०रुपयांनी विक्री होत आहे.