पनवेल : इंटरनॅशनल प्रापॅर्टी ॲण्ड ट्रॅव्हलच्यावतीने थायलंड येथे नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ‘बेस्ट पब्लिक सर्व्हिसेस आर्किटेक्चर इंडिया’ या गटामध्ये हितेन सेठी आर्किटेक्चरच्यावतीने सादर करण्यात आलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या नव्या मुख्यालयाच्या आरेखनाला पाच स्टार मानांकनांबरोबर एशिया पॅसिफिक प्रॉपर्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. निर्माणापूर्वी नव्या मुख्यालयाच्या इमारतीच्या आरेखणाला पुरस्कार मिळाल्याने नागरिक कौतूक करत आहेत. पनवेल महानगरपालिकेची नवी इमारत असा पुरस्कार मिळवणारी राज्यातील पहिली पालिकेची इमारत आहे.
इंटरनॅशनल प्रापॅर्टी ॲण्ड ट्रॅव्हलच्यावतीने दरवर्षी विविध देशांमध्ये आशिया खंडातील विविध देशांतील लोकोपयोगी सेवा देणाऱ्या वेगवेगळ्या इमारतींच्या आरेखनांची स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षीची स्पर्धा थायलंड येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आशिया खंडातील विविध देशांतील वास्तू विशारदांनी सहभाग घेऊन आपली आरेखने सादर केली होती. या स्पर्धेमध्ये नवी मुंबईचे हितेन सेठी आर्किटेक्चरच्यावतीने पनवेल महानगरपालिकेच्या नव्या मुख्यालयाचे आरेखन सादर करण्यात आले होते. या आरेखनाला पाच स्टार मानांकनांबरोबर एशिया पॅसिफिक प्रॉपर्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याचबरोबर एशिया पॅसिफिक रिजन पुरस्कारासाठीदेखील या आरेखनाला नामांकन प्राप्त झाले आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण
सहा मजली महापालिकेच्या या नव्या मुख्यालयामध्ये २२४ आसन क्षमतेचे एक मुख्य सभागृह, १ बहुद्देशिय हॉल, समिती सभागृह, टेरेसवरती आर्ट गॅलरी असणार आहे. ही इमारत जास्तीत जास्त टिकाऊ बनविण्यावरती हितेन सेठी आर्किटेक्चरच्यावतीने भर दिला आहे. या पुरस्काराबद्दल आयुक्त गणेश देशमुख यांनी मुख्यालयामध्ये हितेन सेठी यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, एचएसए कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.