नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरातील एका इमारतीच्या बांधकामात मजुरी करणाऱ्या सात बांग्लादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. ही कारवाई कोपरखैरणे पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी केली आहे.

या कारवाईमुळे स्वस्तात मजूर मिळतात म्हणून कुठलीही शहानिशा न करता कामावर ठेवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. बोनकोडे समता नगर गोदाबाई निवास इमारतीतील एका सदनिकेत बांग्लादेशी राहत असल्याची माहिती मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारावर त्यांनी कोपरखैरणे पोलिसांच्या मदतीने सदर ठिकाणी धाड टाकली.

या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेल्या सात जणांपैकी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांची नावे यास्मिन शेख, अनिस शेख, मोहम्मद मिर्झा, गोले मोहम्मद शेख अशी आहेत. तर अल्पवयीन असणाऱ्या तीन मुलींना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

कोपरखैरणे भागात विदेशींचा शिरकाव

नवी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ एक मध्ये बोनकोडेत बेकायदा विदेशी लोकांचे राहण्याचे प्रमाण जास्त होते. बेकायदा राहणाऱ्या नायझेरियन नागरिक आणि पोलिसांची झटापट झाल्यानंतर मात्र पोलिसांनी धाडसत्राचा अवलंब केल्याने अनेक वर्षे विदेशी नागरिक इकडे फिरकत नव्हते. मात्र, काही दिवसापासून पुन्हा कोपरखैरणे भागात विदेशी नागरिकांनी आसरा घेण्यास सुरुवात केल्याचे समोर येत आहे. काही आठवडय़ापूर्वीच एका नायझेरियन नागरिकाला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती.