शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी शुक्रवारी अलिबाग येथील एसीबी कार्यालयात हजेरी लावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तब्बल ४ तास चौकशी करण्यात आली. मी बाळासाहेबांचा लढणारा शिवसैनिक असून असल्या चौकशांना मी घाबरणार नाही, अशी प्रतिक्रीया साळवी यांनी यावेळी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज दुपारी बारा वाजता आमदार साळवी आपल्या लवाजम्यासह अलिबाग येथील एसीबी कार्यालयाबाहेर पोहोचले. त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांना व त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांनाच कार्यालयाच्या आवारात प्रवेश देण्यात आला. उर्वरीत कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर थांबण्यास सांगितले. यानंतर कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी तैनात ठेवण्यात आला होता.

हेही वाचा – नवी मुंबई : फळ भाज्यांच्या स्वस्ताईचा हंगाम; गाजर, वाटाणा फ्लावर, कोबीचे दर गडगडले

हेही वाचा – नवी मुंबई : फिर्याद देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला मारहाण करत जातीवाचक उल्लेख; सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल

आमदार साळवी यांना लाचलुचपत विभागाने मालमत्तेच्या चौकशीची नोटीस पाठवली होती. यानंतर त्यांनी डिसेंबर महिन्यात अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात हजेरी लावली होती. चार तास चौकशीनंतर आणखी सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले होते. यानुसार २० जानेवारी रोजी ते पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दाखल झाले होते. सहा तास त्यांची चौकशी करण्यात आली. साळवी यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तसेच, त्यांच्या आणि त्याच्या कुटुबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची यावेळी चौकशी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, विकास पिंपळे, अमिर ठाकूर, सतीश पाटील, शिवसैनिक, तसेच शेकापचे प्रफुल पाटील आणि दत्ता ढवळे उपस्थित होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla rajan salvi inquiry about properties by alibag anti corruption bureau ssb