उरण ते बेलापूर रेल्वे मार्गासाठी रस्ता बंद ठेवणार, स्थानिकांचा विरोध
उरण : लोकनेते माजी खासदार दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वात देशात गाजलेल्या १९८४ च्या उरण शेतकरी आंदोलनात आपल्या जमिनींच्या हक्कांसाठी पाच शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले. त्यातील तीन शेतकऱ्यांनी नवघर येथील रेल्वे फाटक असलेल्या नवघर फाटय़ावर आपले बलिदान दिल्याने हे फाटक ऐतिहासिक ठरले आहे. मात्र उरण ते बेलापूर दरम्यान सुरू होत असलेल्या प्रवासी रेल्वे मार्गासाठी हे फाटक वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.
उरणमधील शेतकऱ्यांनी नवी मुंबईच्या उभारणीसाठी शासनाकडून जमिनी संपादनाची प्रक्रिया सुरू झाल्याने १६ जानेवारी १९८४ ला जासई येथे विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकऱ्यांचा बळी घेतल्याने शेतकऱ्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. दुसऱ्याच दिवशी शेतकरी नवघर फाटा येथे गोळा झाले. त्यांनी शासनाचा निषेध नोंदविण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी याही शेतकऱ्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात पागोटे येथील तीन शेतकरी मारले गेले. ते याच रेल्वे फाटकावर. त्यामुळे शेतकरी आंदोलनातील हे फाटक ऐतिहासिक आहे. याच फाटकावर दरवर्षी १७ जानेवारीला हुतात्मा शेतकऱ्यांना मानवंदना दिली जाते. मात्र, रेल्वेमार्गामुळे हे फाटक बंद झाले आहे. त्यामुळे गावातील प्रवाशांना नवघर उड्डाणपुलावरून प्रवास करावा लागत आहे.
‘हुतात्मा स्थानक नाव द्या’
बेलापूर ते उरण रेल्वे मागार्वरील नवघर येथील रेल्वे स्थानकाला न्हावा शेवा असे नाव देण्यात आले असून या नावाला येथील नागरिकांचा विरोध असून, ज्या ठिकाणी शेतकरी हुतात्म्यांनी आपले रक्त सांडले त्या स्थानकाला हुतात्मा स्थानक म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.