महासभेत नगरसेवकांची आक्रमक भाषणे
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची शुक्रवारी पहिलीच महासभा झाली. महासभेत लोकप्रतिनिधींनी भाषणांमध्ये राजकीय कारकिर्दीचा आढावाच सभागृहात मांडला. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासूनच मुंढे यांनी आक्रमक कारभाराची चुणूक दाखविल्यानंतर पालिकेतील राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर काहीसे धास्तीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र होते. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणताना कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा आयुक्तांनी उगारला होता. त्यामुळे राजकीय पातळीवर याच्या प्रतिक्रिया उमटल्या.
आयुक्तांच्या पहिल्याच महासभेत विरोधी पक्ष नेते सभागृह नेते, सभापतीसह जुन्या व नव्या लोकप्रतिनिधींनी शहराची राजकीय पातळीवरही अधिक शहाणपण असल्याचे भाषणांमधून दर्शविले.
अनुभव व्यक्त करताना नवी मुंबईबद्दल नगरसेवकांनाही अधिक कळवळा असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. या वेळी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी सिडकोत नऊ वर्षे संचालक म्हणून काम केल्याचा अनुभव वारंवार उल्लेखला. याशिवाय सभागृहशास्त्राचे पुरेसे ज्ञान असल्याचे सांगितले.
नगरसेवक संजू वाडे यांनी पालिकेतील २२ वर्षांच्या कामाचा उल्लेख केला. नगरसेवक रामचंद्र घरत यांनी राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्याचे सांगितले, तर नगरसेविका अपर्णा गवते यांनी पालिकेत १२ वर्षांपासून कामाचा अनुभव असल्याचे सांगितले. शहराचा कळवळा असल्याचे विरोधी आणि सत्ताधारी नगरसेवकांनी वारंवार सांगितले. त्यामुळे पालिकेत आम्हीही कसे शहाणे आहोत, असे ठासून सांगण्यात नगरसेवकांमध्ये चढाओढ लागली होती, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती.