२०१८ सालापासून युलू सायकलच्या माध्यमातून  ३५ लाख किलोमीटर इतक्या फेऱ्या

संतोष जाधव

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात युलू सायकल प्रकल्पाला १ नोव्हेंबर २०१८ पासून सुरुवात झाली. आतापर्यंत या जनसायकल प्रणालीच्या माध्यमातून नवी मुंबईकरांनी ३५ लाख कि.मी. फेऱ्या (राईड्स) केल्या असून या जनसायकल प्रणालीचा वापर करणारे नवी मुंबई हे भारतातील सर्वात जास्त प्रतिसाद देणारे शहर ठरले आहे.  नवी मुंबई शहरात दळणवळणाच्या जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याबरोबरच नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने ‘वॉकॅबिलिटी’ वाढवण्यासाठी शहरात आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध प्रकल्प राबवले जात आहेत. शहरातील नागरिकांच्या तंदुरुस्तीसाठी पालिकेने  १ नोव्हेबर २०१८ पासून राबवलेल्या युलू सायकल प्रकल्पाला नवी मुंबईकरांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून आता शहरात  ई-बाईकलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शहरातील नागरिकांना चांगल्या भौतिक सुविधा देण्याबरोबरच शहरातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे व त्यांना विविध योजना व प्रकल्पांद्वारे चांगल्या सुविधा देण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून केले जात आहे. शहरातील विविध ८ विभाग कार्यालयांतर्गत शहरातील रस्ते, दळणवळणाच्या सोयी व इतर सोयीसुविधा देताना देखणी व चांगली उद्याने पालिकेने केली आहेत. तसेच शहरात सुरू करण्यात आलेल्या युलू या सायकल मोहिमेला शहरभर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सुरुवातीला युलू सायकल प्रणाली ही बेलापूर वाशी या परिमंडळ १ क्षेत्रातच २२ ठिकाणी सुरू होती, परंतु त्यानंतर ऐरोलीचे तत्कालीन आ. संदीप नाईक यांच्या पाठपुराव्यानंतर या युलू सायकल सहभाग प्रणालीचा प्रारंभ कोपरखैरणे निसर्ग उद्यान तसेच ऐरोली सेक्टर १५ येथील जॉिगग ट्रॅक येथे करण्यात आला. महाराष्ट्रात नवी मुंबई या पहिल्याच शहरात ई-बाईक सहभाग प्रणालीला सुरुवात करण्यात आली. शहरात मोठय़ा प्रमाणात तरुणाईकडून दुचाकी वाहनांचा वापर करण्यात येत असून त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु या ई-बाईकमुळे प्रदूषणालाही आळा बसणार आहे. मागील दोन वर्षांपासून करोनाच्या काळात व टाळेबंदीच्या काळानंतर अंशत: टाळेबंदीच्या काळातही या सायकल प्रणालीचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आला.

शहरात मोठय़ा प्रमाणात जिमचा वापर तरुणांकडून करण्यात येत असताना शहरातील जनसायकल प्रणालीला तरुणाईसह नागरिकांचा सर्वात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आतापर्यंत सायकल प्रणालीतून ३५ लाख कि.मी. राईड्स करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे इंधनावरील दुचाकी व त्यामुळे होणारे प्रदुषण कमी झाले असून देशात सायकल प्रणालीचा वापर करणारे व सर्वाधिक सायकल प्रणालीला प्रतिसाद देणारे नवी मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले आहे. शहरात ६०० सायकल १०८ ई-बाईक्स प्रवासी सेवेत आहेत. नवी मुंबईत लाखो नागरिक तंदुरुस्तीसाठी सायकलचा वापर करत असून त्यामध्ये महिला व तरुणाईचे प्रमाणही अधिक आहे.

विद्युत बस खरेदी

पालिकेच्यावतीने सध्या पालिका परिवहन उपक्रमात १८० इलेक्ट्रिक बस असून आणखी ८६ इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहे. तर पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे महाराष्ट्र शासनाने उचलले असून पालिकेनेही शासकीय वापरासाठी यापुढे इलेक्ट्रिक वाहने खरेदीचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई शहर हे जनसायकलचा वापर करणारे व प्रतिसाद  देणारे देशातील पहिले शहर आहे. नवी मुंबईकरांच्या प्रतिसादामुळे पर्यावरणपूरक  कामासाठी प्रोत्साहन मिळत असून पालिकाही शहरात परिवहन उपक्रमाच्या व पालिकेसाठी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक वाहने घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून सायकलचा वापर मोठय़ा प्रमाणात वापर करणाऱ्या व सजगता दाखवणाऱ्या पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांचे कौतुक आहे. 

– अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका