संतोष जाधव

बंगळूरु, मुंबईच्या धर्तीवर कचराकुंडय़ांसाठी चाचपणी;  ५० ठिकाणांचे सर्वेक्षण

स्वच्छ अभियानात चांगल्या कामगिरीमुळे गौरविण्यात आल्यानंतर नवी मुंबई महापालिका बंगळूरु, मुंबईच्या धर्तीवर भूमिगत कचराकुंडय़ांचे नियोजन करीत आहे. याबाबत शहरातील ५० संभाव्य ठिकाणांची पाहणी केली असून प्रायोगिक तत्त्वावर हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे. तसे झाल्यास सार्वजनिक ठिकाणी कचरा हद्दपार होऊन दरुगधी व प्रदूषणातून नवी मुंबईकरांची मुक्तता होणार आहे.

नवी मुंबई शहरात सुरुवातीला घंटागाडीद्वारे कचरा संकलन होत होते. आता मोठय़ा गाडय़ांद्वारे कचरा उचलला जात आहे. तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेत सोसायटय़ांना कचरा वर्गीकरणाची सक्ती केली होती. आताही सोसायटय़ांमध्येच कचरा वर्गीकरण बंधनकारक आहे.

सार्वजनिक ठिकाणचा कचरा विविध आकाराच्या कचराकुंडय़ांमध्ये संकलन केले जात असून ओला व सुका कचरा वाहतुकीसाठी वेगवेगळ्या गाडय़ांचा वापर केला जातो. स्वच्छ नवी मुंबई शहरात सार्वजनिक ठिकाणी आजही अनेक वेळा कचराकुंडय़ा भरून वाहतानाचे चित्र पहावयास मिळते. त्यामुळे दुर्गंधीबरोबर प्रदूषणही होत असते. इतर शहरांच्या तुलनेत हे प्रमाण खूप कमी असले तरी आता पालिकेने हा सार्वजनिक ठिकाणी दिसणारा कचराही हद्दपार करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी बंगळूरु शहराच्या धर्तीवर भूमिगत कचराकुंडय़ा करण्याचे नियोजन सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या भूमिगत सार्वजनिक कचराकुंडय़ा शहरात लावण्यात येणार असून यासाठी ५० ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. जागांची पाहणी करताना कचराकुंडय़ा भूमिगत केल्याने या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचणार नाही, वाहनांचे पार्किंग केले जाणार नाही, आशा जागांचा शोध सुरू आहे. याबाबत पालिका प्रशासन प्रस्ताव तयार करीत आहे.

कचरा पेटय़ांना सेन्सर

या भूमिगत कचराकुंडय़ांचा आकार १६ बाय २० ते १६ बाय ३२ असा असणार असून १.५ टन कचरा साठवता येणार आहे. या कचरा पेटय़ांना सेन्सर लावण्यात येणार असल्याने भरल्यानंतर तत्काळ पालिकेला याची माहिती मिळणार असून तो कचरा उचलला जाणार आहे. त्यासाठी खर्चही कमी लागणार आहे. त्या सोसायटीतील कचरा या भूमिगत कचरा कुंडय़ात टाकता येणार नाही.

खर्चही कमी

कचरा वाहतुकीसाठी लागणारा सध्याचा महापालिकेचा खर्च महिन्याला ४.५ ते ५ कोटी आहे. तर या भूमिगत कचराकुंडय़ांसाठी एकंदरीत ८ ते ९ कोटींचा खर्च येणार आहे.

नवी मुंबई महापालिकेचा स्वच्छतेबाबत देशात गौरव केला गेला आहे. बंगळूरु शहरात, अशी भूमिगत कचराकुंडय़ांचा प्रयोग सुरू आहे. नवी मुंबईत त्याची चाचपणी सुरू असून ५० ठिकाणांचे सर्वेक्षण केले आहे. याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात येणार आहे.

-तुषार पवार, उपायुक्त.