दोन्ही रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने वाशी येथील पालिकेच्या मध्यवर्ती रुग्णालयावर रुग्णांच्या उपचाराचा प्रचंड ताण वाढला आहे.  ३०० खाटांच्या रुग्णालयात ४०० रुग्ण उपचार घेत आहेत. अत्यवस्थ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अर्धवट उपचार करून काही रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे. अशाच एका रुग्णाला रुग्णालयाबाहेर आल्यानंतर भोवळ आली आणि तो खाली कोसळला. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांच्या चिंतेत भर पडली आहे. बाह्य़ रुग्ण उपचार केंद्रावर अडीच ते तीन हजार रुग्ण रोज उपचार घेत आहेत. यात चेंबूर, मानखुर्द आणि गोवंडी या भागांतून रुग्ण येत आहेत.

नवी मुंबई पालिकेने काही वर्षांपूर्वी पाचस्तरीय आरोग्य सेवा पद्धत राबविली होती. त्यानुसार प्रत्येक गाव आणि नोडमध्ये नागरी आरोग्य केंद्र आणि काही मुख्य भागांत माता बाल संगोपन केंद्राची उभारणी केली होती. त्यानंतर शहराच्या चारही दिशांना काही छोटय़ा रुग्णालयांची सुरुवात करण्यात आली होती. याच वेळी वाशी येथे ३० कोटी खर्चून एक मध्यवर्ती रुग्णालय बांधण्यात आले होते. येथील आरोग्य सेवा कोलमडली आहे. बेलापूर, नेरुळ आणि ऐरोली येथे ३०० कोटींहून अधिक निधी खर्चून बांधलेले रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. बांधकाम करताना या रुग्णालयांना लागणाऱ्या काही वैद्यकीय उपकरणांची तरतूद करण्यात आलेली नसल्याने त्याचे काम नव्याने काढावे लागले आहे. त्यामुळे ही रुग्णालये सुरू करता आलेली नाहीत. याचा परिणाम शहरातील सर्व गरीब गरजू रुग्णांना वाशी येथील पालिकेच्या मध्यवर्ती रुग्णालयाचा आधार झाला असून नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातील रुग्ण उपचारार्थ जात आहेत.

रुग्णालयाची क्षमता ३०० खाटांची असताना आज त्याच खाटांजवळ, बाहेरील मोकळ्या जागेत सुमारे ४०० ते ४५० रुग्ण उपचार घेत आहेत. या सेवेत एखाद्या अत्यवस्थ रुग्णालयाला सामावून घेण्यासाठी लवकर घरी सोडले जात आहे. अशाच प्रकारे एका रुग्णालयाला लवकर डिस्चार्ज दिल्याने तो घरी जाताना भोवळ येऊन प्रवेशद्वाराजवळ पडला. त्यामुळे त्याला पुन्हा दाखल करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली. रुग्णांची संख्या दुप्पट तिप्पट वाढलेली असताना नर्स, वॉर्डबॉय, डॉक्टर ही संख्या केवळ ६२५ पर्यंतच आहे. त्यामुळे अनेक डॉक्टर आजारी पडत असून काही जण नोकरी सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. तीनतेरा वाजलेल्या या आरोग्य सेवेची गाडी रुळावर आणण्यासाठी मात्र पालिका कोणतीही उपाययोजना करीत नाही.

 

डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयाचा जास्तीत जास्त वापर हे मुंबईतील चेंबूर, गोंवडी, मानखुर्द येथील रुग्ण करीत असल्याने या ठिकाणी पसरू लागलेली डेंग्यूच्या साथीचा पारिणाम नवी मुंबईत होण्याची शक्यता असून आता ७६ रुग्ण संशयित असून त्यातील १५ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.

खर्च वाढला

पालिकेच्या वतीने बेलापूर, नेरुळ, ऐरोली येथे बांधण्यात आलेल्या १५० खाटांच्या रुग्णालयाची बांधकाम खर्च अवाच्या सवा वाढला आहे. त्यामुळे या रुग्णालयांच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थायी समितीने केली आहे. एखाद्या स्थापत्य कामाची सामूहिक चौकशी करण्याची ही पालिकेची पहिलीच वेळ मानली जात आहे.