पनवेल : पनवेल शहरात नवीन बनविलेल्या डांबरी रस्त्यावर लगेच पहिल्याच पावसात खड्डे पडल्याची प्रसारमाध्यमांमध्ये मोठी चर्चा झाली. पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी नागरिकांच्या तिखट प्रतिक्रियांची गंभीर दखल घेत महापालिका क्षेत्रातील चारही प्रभागांमध्ये नेमलेल्या कंत्राटदार कंपन्यांनी केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमली आहे. ही समिती अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका महिन्याच्या आत चौकशी करून त्याचा अहवाल आयुक्तांना सोपविणार आहे.
विशेष म्हणजे ज्या चार कंत्राटदार कंपन्यांना महापालिकेने नोटीस बजावले आहे त्यामध्ये आमदारांच्या कुटुंबियांची टीआयपीएल आणि भाजपचे पदाधिकारी जे. एम. म्हात्रे यांच्या कंपनीचा समावेश असल्याने आयुक्तांनी त्यांचे नोटीसशस्त्र कंत्राटदारांवर चालविल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या ठाकूर इन्फ्रा. प्रोजेक्ट प्रा. लिमिटेड (टीआयपीएल) या कंपनीला खारघर येथील लिटील वर्ल्ड मॉल सेक्टर २ ते उत्सव चौक या रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि इतर रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम देण्यात आले होते.
भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले जे.एम. म्हात्रे यांच्या मालकीच्या जे.एन.म्हात्रे इन्फ्रा. प्रा. लिमिटेड या कंपनीला कामोठे येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम देण्यात आले होते. याशिवाय पी.डी. इन्फ्रा. प्रोजेक्ट प्रा. लिमिटेड या कंपनीला प्रभाग ब आणि ड येथील रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम देण्यात आले होते. तसेच पी. पी. खारपाटील कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड या कंपनीला खारघर येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम देण्यात आले होते.
आदेश काय?
चारही कंत्राटदार कंपनीला याबाबत नोटीस देऊन नागरिकांना होत असलेल्या तक्रारींचा दाखला देत पावसाळा संपताच संबंधित रस्त्यांचे काम पुन्हा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच या कंत्राटदारांनी रस्त्यांचे डांबरीकरण करताना वापरलेल्या डांबर कंपनीबाबत अनेक स्तरातून रोष व्यक्त करण्यात आल्याने आयुक्तांनी नोटीशीत शासनाच्या अधिकृत भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपन्यांकडूनच घेतलेल्या डांबराने रस्त्याचे डांबरीकरण करण्याची अट घातली आहे. तसेच या कामाकरिता महापालिका कोणताही अतिरिक्त खर्च करणार नसून अन्यथा निविदेमधील करारनाम्यातील तरतूदीनुसार महापालिका कारवाई करेल असेही बजावले आहे.