लोकसत्ता प्रतिनिधी
पनवेल : पनवेल पालिका होऊन चार वर्षे झाली तरी पायाभूत सुविधांच्या हस्तातंरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. हस्तांतरण करताना सुविधा परिपूर्ण देण्याची पालिकेची मागणी आहे. मात्र सिडकोकडून याची अद्याप दखल घेतली गेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने आता संवादाच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्याचे ठरविले आहे. संवादाची ही बैठक लोकप्रतिनिधी व विधिमंडळ सदस्य आणि सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यामध्ये घेतल्यास हे हस्तांतरण सुलभ होईल, अशी अपेक्षा पालिका प्रशासनाची आहे.
पनवेल पालिका क्षेत्रात सिडको मंडळाचे सुमारे ३६० पेक्षा अधिक भूखंड आहेत, मात्र आतापर्यंत फक्त ४८ भूखंड पनवेल पालिकेला सिडको मंडळाने हस्तांतरण केले आहेत. पनवेल पालिका क्षेत्रात ८० टक्के परिसर हा सिडको वसाहतींचा आहे. घनकचरा विभाग पालिकेने सिडकोकडून हस्तांतरित केलेला आहे. मात्र पाणीपुरवठय़ासह रस्ते व इतर १४ पायाभूत सुविधा या सिडकोकडेच आहेत. या संदर्भात पालिकेने त्या हस्तांतरणाची इच्छा व्यक्त करीत हे प्रश्न सुसुविधेत पालिकेकडे मिळावेत ही अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र यावर सिडकोकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पालिकेने हा संवादाचा पर्याय हाती घेतला आहे.
सिडकोची प्रत्येक पायाभूत सुविधेविषयी भूमिका काय याविषयीची भूमिका समजून घेण्याविषयी पालिका प्रशासन उत्सुक आहे. महापौर कविता चौतमोल यांच्यासह पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्याकडे डिसेंबर महिन्यात संवाद बैठकीसाठी वेळ मागितला आहे.
नागरी सुविधांचे हस्तांतरणापूर्वी सिडको मंडळाने हस्तांतरणाची मापदंड ठरविणे गरजेचे आहे. मागितले म्हणून दिले असे झाल्यास भविष्यात पनवेल पालिकेला सोयीसुविधांवर कोटय़वधींचा खर्च येणार आहे. त्यामुळे येईल त्यामुळे हस्तांतरणापूर्वी प्रमाणित मापदंड ठरविण्याची पालिकेची मागणी आहे.
महत्त्वाचे प्रश्न
’ सिडको आजही सेवाशुल्क वसूल करत असल्याने कर वसुलीबाबत धोरण निश्चित करणे.
’ पुरेसे पाणी पनवेल पालिका क्षेत्रातील नागरिकांना उपलब्ध होणे.
’ विमानतळासाठी पालिकेच्या संपादित केलेल्या जागेचा मोबदला मिळणे.
’ आरोग्य केंद्र, शाळा भूखंड याविषयी धोरण ठरविणे.
’ आरक्षित खुल्या जागा व भूखंडाचे हस्तांतरण.
’ करंजाडे येथील कचरा प्रकल्पाच्या जागेवर वाणिज्य संकुलासाठी मंजुरी
’ खारघर व इतर वसाहतींमध्ये रस्ते व इतर विकास.
’ अग्निशमन दलाच्या हस्तांतरण मनुष्यबळ, यंत्रणा आणि इमारतींच्या संरचना तपासणीसह
’ सिडको वसाहतींमधील स्मशानभूमी आणि शवदाहिन्या हस्तांतरणाचा कालावधी ठरविणे.